Childhood obesity saam tv
मुंबई/पुणे

Childhood obesity: मुलांमधील वाढतं वजन ठरतंय चिंतेचा विषय; लठ्ठपणामुळे मधुमेहासह अनेक आजारांचा धोका

Childhood obesity in India: मुलांमधील लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि यकृतात चरबी साठण्याचा धोका वाढू शकतो. वाडिया बाल रुग्णालयात तीन वर्षांत सुमारे ३०० मुलांवर उपचार झाले. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि वेळेवर वैद्यकीय तपासणी महत्त्वाची आहे.

Surabhi Jayashree Jagdish

लहान मूल गोंडस दिसतंय, त्याचं वजनही चांगलं वाढतंय, असं म्हणत अनेक पालक मुलांच्या वाढत्या वजनाकडे आनंदाने पाहतात. मात्र हेच वाढतं वजन भविष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतं. चुकीच्या आहाराच्या सवयी, मैदानी खेळांचा अभाव आणि मोबाईल, टीव्हीसमोर जास्त वेळ घालवल्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढत आहे. मुंबईतील बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालयात गेल्या तीन वर्षांत लठ्ठपणाची समस्या असलेल्या सुमारे ३०० मुलांची नोंद झालीये. दरवर्षी सरासरी १०० मुलं उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे मुलांच्या वाढत्या वजनाकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे.

लठ्ठपणामुळे मुलांना कोणत्या आरोग्य समस्या होऊ शकतात?

लठ्ठपणामुळे मुलांना टाइप-२ मधुमेह, उच्च रक्तदाब, रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढणं, लिव्हरमध्ये चरबी साठणं, झोपेत श्वास घेण्यास त्रास होणं आणि सांधेदुखी अशा समस्या उद्भवू शकतात. किशोरवयीन मुलींमध्ये वाढलेलं वजन आणि इन्सुलिन रेझिस्टन्समुळे मासिक पाळी अनियमित होण्याची शक्यता असते. त्यामुळे या लक्षणांकडे केवळ वयात येण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून दुर्लक्ष करू नये, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

भारतातही मुलांमधील लठ्ठपणाचं प्रमाण वाढतंय

जगभरात गेल्या तीन दशकांत लहान मुलांमधील लठ्ठपणाचं प्रमाण वाढलं आहे. २०२२ मधील अंदाजानुसार, भारतात ५ ते १९ वर्षे वयोगटातील सुमारे ३.४ टक्के मुलं आणि किशोरवयीन मुलं लठ्ठपणाने प्रभावित होती.

राष्ट्रीय आकडेवारीनुसार, पाच वर्षांखालील मुलांमध्ये सुमारे २.७ टक्के, ५ ते ९ वर्षे वयोगटातील ४.२ टक्के आणि १० ते १९ वर्षे वयोगटातील ५ टक्के मुलांमध्ये अतिरिक्त वजन किंवा लठ्ठपणाची समस्या आढळते. शहरीकरण, बैठी जीवनशैली आणि बदलत्या आहाराच्या सवयींमुळे काही समुदायांमध्ये हा धोका अधिक असू शकतो.

तीन वर्षांत ३०० मुलांवर उपचार

बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालक आणि बाल हार्मोनतज्ज्ञ डॉ. सुधा राव यांनी सांगितलं की, रुग्णालयाच्या बाल-एंडोक्रायनोलॉजी विभागात गेल्या तीन वर्षांत लठ्ठपणाची समस्या असलेली सुमारे ३०० मुलं आणि किशोरवयीन रुग्ण उपचारासाठी आले आहेत. दरवर्षी सरासरी १०० मुलांची नोंद होते. यावरून रुग्णालयात येणाऱ्या मुलांमध्ये लठ्ठपणाशी संबंधित समस्या सातत्याने आढळत असल्याचं दिसून येतं.

डॉ. राव यांच्या वैद्यकीय अनुभवात ८० टक्क्यांहून अधिक मुलांमध्ये जीवनशैलीशी संबंधित लठ्ठपणा आढळतो. या मुलांमध्ये लठ्ठपणामागे कोणतंही स्पष्ट हार्मोनल किंवा आनुवंशिक कारण दिसून येत नाही. त्यामुळे प्रत्येक लठ्ठ मुलाला हार्मोनचा विकार आहे असं समजणं चुकीचं आहे. संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचाल, पुरेशी झोप आणि संपूर्ण कुटुंबाने जीवनशैलीत केलेले बदल हे उपचाराचे महत्त्वाचे भाग आहेत.

वजन वेगाने वाढत असल्यास वैद्यकीय तपासणी गरजेची

काही मुलांमध्ये लठ्ठपणामागे इतर वैद्यकीय कारणंही असू शकतात. अगदी लहान वयातच लठ्ठपणा येणं, वजन खूप वेगाने किंवा अनपेक्षितपणे वाढणं, वजन वाढत असताना उंची अपेक्षेप्रमाणे न वाढणं, विकासात अडचणी येणं किंवा शरीराच्या ठेवणीत असामान्य बदल दिसणं ही लक्षणं असल्यास सखोल वैद्यकीय तपासणी करणं गरजेचं ठरू शकतं.

डॉ. राव यांनी सांगितलं की, लठ्ठपणामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्या बालपणातच सुरू होऊ शकतात. इन्सुलिन रेझिस्टन्समुळे पुढे प्री-डायबिटीज किंवा टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढू शकतो. उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलच्या पातळीत असंतुलन, यकृतामध्ये चरबी साठणं आणि झोपेत श्वास घेण्यास अडथळे येणं अशा समस्याही उद्भवू शकतात.

किशोरवयीन मुलींमध्ये वाढलेलं वजन आणि इन्सुलिन रेझिस्टन्समुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते किंवा काही काळ बंदही होऊ शकते. यासोबतच पीसीओएस म्हणजे अंडाशयांशी संबंधित हार्मोनल समस्या उद्भवण्याची शक्यताही असते. या लक्षणांमध्ये वयानुसार आपोआप सुधारणा होणार आहे, असं समजून दुर्लक्ष करू नये.

मुलांच्या आहारावर खूप बंधनं घालू नका

मुलांचं वजन कमी करण्यासाठी त्यांच्या आहारावर खूप बंधनं घालणं किंवा वजन वाढल्याबद्दल त्यांना दोष देणं योग्य नाही. त्याऐवजी संपूर्ण कुटुंबाने आरोग्यदायी सवयी स्वीकारणं गरजेचं आहे. मुलांना घरचं आणि संतुलित जेवण द्यावं. आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश करावा. गोड पेयं आणि हवाबंद डब्यांमध्ये मिळणाऱ्या पदार्थांचं सेवन मर्यादित ठेवावं.

मुलांनी दररोज शारीरिक हालचाल करावी, मनोरंजनासाठी मोबाईल आणि टीव्हीसमोर घालवला जाणारा वेळ कमी करावा आणि पुरेशी झोप घ्यावी. त्यांच्या दिनचर्येत सहज पाळता येतील असे बदल केल्यास त्याचा दीर्घकाळ फायदा होऊ शकतो.

पालक आणि शाळांची भूमिका महत्त्वाची

डॉ. सुधा राव यांनी सांगितलं की, मुलांमधील लठ्ठपणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालक, शाळा आणि आरोग्यतज्ज्ञ या सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे. मुलांचं वजन कमी करणं हाच यामागील उद्देश नसून त्यांची निरोगी वाढ सुनिश्चित करणं आणि भविष्यात मधुमेहासारख्या आजारांचा धोका कमी करणं अधिक महत्त्वाचं आहे. लहान वयातील लठ्ठपणा टाळता येऊ शकतो आणि त्यावर उपचारही शक्य आहेत.

वाडिया रुग्णालयात दर शनिवारी विशेष ओपीडी

मुलांमधील लठ्ठपणाचं वेळेत निदान व्हावं आणि योग्य उपचार मिळावेत यासाठी वाडिया बाल रुग्णालयात दर शनिवारी दुपारी २ ते ५ या वेळेत लठ्ठपणासाठी स्वतंत्र ओपीडी सुरू करण्यात आलीये. लठ्ठपणा आणि मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजेच चयापचयाशी संबंधित विकार यांच्यातील संबंधांचा अभ्यास करण्यासाठी रुग्णालयात संशोधनही सुरू आहे.

वाडिया ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितलं की, मुलांमधील लठ्ठपणाकडे शारीरिक दोष किंवा लाजिरवाणी बाब म्हणून पाहू नये. त्याऐवजी योग्य वेळी या समस्येकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मुलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचाल, पुरेशी झोप आणि वेळेवर वैद्यकीय मार्गदर्शन यांचं महत्त्व समजावून सांगण्याचा रुग्णालयाचा प्रयत्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आंदोलनापूर्वी अभिजित दिपकेंना पोलिसांनी अडवलं

Dental Health Care चुकीच्या उपायांनी दात पांढरे करण्याच्या नादात होईल मोठं नुकसान? जाणून घ्या सत्य

Horoscope : ६ राशींचं नशीब पालटणार? १९ ते २५ ऑक्टोबरदरम्यान करिअर आणि पैशाबाबत मोठे संकेत

Political News : ".....तर भारत पाकिस्तानच्या बाजूने उभा राहील" भाजपच्या बड्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांनी धरलं धारेवर

EPFO चा मोठा निर्णय, पीएफ रिटर्न फाइल करण्याची मुदत वाढवली; शेवटची तारीख काय?

SCROLL FOR NEXT