मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यामध्ये आगामी निवडणुकीबाबत मोठं विधान केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला ओपन चॅलेंज दिलं. 'जोपर्यंत मतदार यादीतील घोळ दूर होत नाही आणि यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही तोपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊनच दाखवा.', असे आव्हान त्यांनी केले आहे. राज ठाकरे यांनी यावेळी मतदार यादीमधील गोंधळावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर देखील निशाणा साधला.
अंबानी- अंदानींना शहरं द्यायची असल्याचा आरोप करत राज ठाकरे म्हणाले की, 'हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार असूनही ते सांगताता की बोगस मतदार भरले आहेत याद्यांमध्ये. म्हणजे कोणत्या निवडणुका आपल्याकडे चालू आहेत. हे गेल्या १० -१२- १५ वर्षातच का प्रश्न पडले. जी लोकं भाबळेपणाने मतदान करत आहेत, उन्हात उभे राहून मतदान करत असतील त्यांच्या मताला किंमत नसेल तर कशासाठी निवडणुका लढवायच्या आहेत. केंद्रात आम्ही, राज्यात आम्ही, पालिकेत आम्हीच, जिल्हा परिषदेतही आम्हीच पाहिजे यासाठी हे सगळं चालले आहे. राज्यातील शहरं अदानी -अंबानींना द्यायची आहेत यांना. शहरं अदानी अंबानीला आंदण द्यायचे म्हणून हे सर्व चालू आहे'
'भाजपला मतदान करणाऱ्या मराठी लोकांना मला सांगायचे आहे की अदानी, अंबानी आणि गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरेल तेव्हा तुम्हाला कुणाला ते बघणार नाहीत. सर्व गोष्टीत अदानी. वीज बनवायची आहे अदानी, रस्ते- टनल बनवायचा अदानी सगळीकडे अदानी. पण मी हे खपवून घेणार नाही. अटल सेतू, सी लिंक हे तुमच्यासाठी नाही तर ते उद्योगपतींसाठी आहे. सगळ्या गोष्टींमध्ये हात घालायचा. नजर पडेल ते मला पाहिजे हे सुरू आहे. आमच्याकडे कुंपनच शेत खात आहेत. आमचीच मराठी माणसं यांना जमिनी मिळवून देत आहेत. आमची मराठी माणसं त्यांच्यासाठी दलाल म्हणून काम करत आहेत. केंद्र आणि राज्य हातात आहेत. उद्या पालिका आणि जिल्हापरिषदा हातात आल्या तर रान मोकळं. हे सगळं सहज सुरू नाही हे सर्व प्लान आहे.'
मुंबई गुजरातला नेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे मत व्यक्त करत राज ठाकरे यांनी सांगितले की, 'ज्यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला. गुजरातला मुंबई हवी होती आणि महाराष्ट्राला मुंबई देऊ नका असं बोलणारे पहिले कोण होते ते म्हणजे वल्लभभाई पटेल. कुणाचाच विश्वास बसणार नाही. आचार्य आत्रेंची पुस्तकं वाचा सर्व काही समजेल. हे आताचे नाही हे जुनं आहे. हे आता फक्त सर्वांच्या सहाय्याने होत आहे. सर्व काही हातामध्ये आलं तर नंतर तुम्ही काय करू शकणार नाही. जमीन हातातून गेली तर परत येत नाही. जमीन हेच अस्तित्व आहे. त्यासाठीच हे सर्व काही आहे.'
तसंच, 'सर्वांना विनंती आहे की सतर्क राहा. एका एका घरात ८०० मतदार भरत आहेत. खोटी नावं भरून यांना निवडणुका घ्यायच्या आहेत. सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने होणार. यादी प्रमुखांना त्यााठीच बोलावले आहे. सर्व यादी प्रमुखांनी घरोघरी जावे. जोपर्यंत मतदार यादी स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नका. तसं जर नाही झाले तर निवडणुका घेऊनच दाखवा. सर्व पक्षांनी घराघरात गेलं पाहिजे आणि याद्या तपासल्या पाहिजे. आधीच ५ वर्षे झाली आहेत निवडणुका घेऊन आणखी १ वर्षे गेले तरी चालले. जोपर्यंत यादी स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका.' , असे म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाला थेट इशारा दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.