सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी
भोर-महाड मार्गावरील वरंधा घाट रस्ता पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या दुर्घटना टाळण्यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी, सुरक्षिततेच्या कारणामुळे तसेच भोर हद्दीत सुरु असलेल्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु असल्याने पुणे प्रशासनाच्या आदेशानुसार ३० सप्टेंबर पर्यंत घाट जड वाहनांना, तर रेड व ऑरेंज अलर्ट काळात हलक्या वाहनांना बंद केला आहे. मात्र या आदेशाचे पालन न करता या मार्गावरून वाहतूक सुरू रहात असल्याने रायगड प्रशासनाकडून शुक्रवारी (ता. २०) दुपारी भोर-महाड हद्दीजवळील रायगड हद्दीत दगड मातीचे ढिगारे टाकून रस्ता बंद केला. मात्र, यामुळे अडकून फसगत झालेल्या वाहनचालकांकडून दगडी बाजूला करुन चारचाकी वाहनांपुरता मार्ग तयार केल्याने तात्पुरत्या स्वरुपात हलकी वाहने सायंकाळपर्यंत सुरु होती. अचानक दगडींचे ढिगारे टाकल्याचे कळताच नागरीकांकडून नाराजीचे सूर दिसून आले.
हलकी वाहने सुरु ठेवण्याची स्थानिकांची मागणी
वरंधा घाट सर्वच वाहनास बंद केल्यास हिर्डोशी परिसरातील देवघर, वेनुपुरी कोंढरी, हिर्डोशी, वारवंड, कारुंगण,शिरगाव, शिळिंब,आशिंपी, उंबर्डे, दुर्गाडी, अभेपुरी, चौधरीवाडी या गावातील नागरिकांची प्रवाशाची मोठी गैरसोय होणार आहे. मुळातच या मार्गावरील एकमेव शिळिंब मुक्कामी एसटी सोडली तर कोणतीही एसटी सुरु नाही. त्यामुळे गेले वर्षभर किंबहुना गेले अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक या मार्गावरुन जाणाऱ्या खाजगी वाहनांनी प्रवास करत आहेत. परंतू आता रस्त्यावर दगडी टाकून घाट बंद केल्याने या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे हलक्या वाहनांसाठी घाट कायमस्वरुपी बंद करु नये अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
"प्रत्येक वेळी सुरक्षितेच्या कारणासाठी हा घाट रस्ता गेले पाच सहा वर्षांपासून बंद केला जात आहे. घाट परिसरात असणाऱ्या उंबर्डे, अशिंपी, शिळींम, शिरगाव येथील नागरिक वरंध व बिरवाडी या महाड तालुक्यातील गावात दवाखाना, बाजारहाट, यासाठी सतत ये जा करत असतात. तर उंबर्डे परीसरातील मुले नजीक असल्याने घाटाखालील वरंध येथे शिक्षणासाठी जात आहेत. त्याचे आता नुकसान होणार आहे. तरी प्रशासाने सर्व वाहनांसाठी रस्ता बंद करु नये."
- प्रकाश पवार, ग्रामस्थ उंबर्डे ता.भोर
"वरंधा घाट बंद करण्याचा प्रकार गेले पाचसहा वर्षांपासून सुरु आहे. यावर ठोस उपाययोजना न करता नुसते पत्र काढून लोकांची गैरसोय करणे एवढाच उद्देश यातून दिसत आहे. गेल्या पाचसहा वर्षात घाट सुरु राहण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत का ? विशेष म्हणजे रस्ता रुंदीकरणाचे काम हिर्डोशी परिसरात सुरु आहे, घाटात नाही. घाटात रस्ता चांगला आहे. तरीही घाट बंद केला जातोय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना याबाबत मेल केला आहे. यावर विचार होऊन सर्वसामान्यांचा आर्थिक भुर्दंड व वेळ वाचण्यासाठी हलकी वाहने सुरु राहवीत."
- डॉ नितीन देशमुख, ग्रामस्थ वरंध ता.महाड
भोर प्रशासनाकडून सूचनादर्शक फलक लावण्याची गरज
वाहनचालकांना घाट बंद असल्याचे समजण्यासाठी वेळ लागनार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कापुरव्होळ, शिंदेवाडी (ता.खंडाळा) या भोरकडे येणाऱ्या फाट्यांवर तसेच वरंधा घाटाकडे जाणाऱ्या भोर हद्दीत व नीरा देवघर धरणाजवळील निगुडघर येथे वाहनचालकांना सहज दिसेल असे घाट बंद असल्याबातचे सुचना फलक लावणे गरजेचे आहे. जेणेकरून वाहनचालकांचा हेलपटा वाचून फसगत होणार नाही.
पर्यायी मार्ग -
वरंधा घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या कालावधीत कोकणातून पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांनी राजेवाडी फाटा – महाड – माणगाव – ताम्हिणी घाट – पुणे हा पर्यायी मार्ग वापरावा. तसेच, कोल्हापूरकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांनी राजेवाडी फाटा – पोलादपूर – खेड – चिपळूण – कराड – कोल्हापूर हा मार्ग निवडावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.