शिरूर मतदारसंघात आमदार माऊली कटकेंच्या पत्नीचे दोन ठिकाणी मतदार यादीत नाव असल्याचा आरोप माजी आमदार अशोक पवार यांनी केला आहे.
वाघोलीत मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
अशोक पवार यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना अनेक पत्रं लिहून निवडणुकीत पारदर्शकता राखण्याची मागणी केली आहे.
शिरूर विधानसभा मतदारसंघात आमदारांच्याच पत्नीचे दोन ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माजी आमदार अशोक पवार यांनी माऊली आबा कटकेंवर हे गंभीर आरोप केले आहेत. बाहेरील जिल्ह्यातील अनेक जण वाघोलीमध्ये मतदार आहेत याचा फटका मला विधानसभेत बसला असल्याची माहिती अशोक पवार यांनी सांगितली. पालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक काळात बोगस मतदार नाव याद्यातून वगळावे, अशी मागणी अशोक पवार यांनी केली.
शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये वाघोलीत मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार असल्याचं उघडकीस आले आहे. याबाबत माजी आमदार अशोक पवार यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना १८ पत्र लिहिले आहेत. बोगस मतदार नोंदणी होत असल्याची तक्रार मी तत्कालीन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे केली होती. मात्र त्यांनी त्याची दखल घेतली नाही.
आमदार माऊली आबा कटके यांच्याच पत्नीचे दोन नाव मतदार यादीत असल्याचा आरोप माजी आमदार अशोक पवार यांनी केला आहे. यापुढील काळामध्ये मतदार याद्या तयार करताना त्यावरती हरकती घेण्यासाठी सहा महिन्याची मुदत देण्यात यावी यासंदर्भात आम्ही न्यायालयीन लढाई लढू त्याचबरोबर पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ही आम्ही बोगस मतदारांवरती लक्ष ठेवणार असल्याचं अशोक पवार यांनी सांगितले.