वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकरी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या कुटुंबीयाचा आणखी एक प्रताप उघड झाला आहे. पूजा खेडकर यांनी आयएएस अधिकारी बनण्यासाठी फसवणूक केल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. त्यांनी आपल्या आई-वडीलांचा घटस्फोट झाल्याचे दाखवत कमी उत्पन्नाचा दाखवण्याचा प्रयत्न केला. आता याप्रकरणाची देखील चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पूजा खेडकर यांनी आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचे भासवून कमी उत्पन्न दाखविण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांचे आई-वडील मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर या दाम्पत्याचा खरच घटस्फोट झाला आहे का? याची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारने पुणे पोलिसांना दिले आहे. याबाबत सविस्तर अहवालही केंद्र सरकारने मागविला असल्याने पूजा खेडकरसह त्यांच्या कुटुंबीयांच्या देखील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर या गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडल्या आहेत. खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह केल्यामुळे त्या चर्चेत आल्या. त्यानंतर हे प्रकरण खेडकर यांच्या शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र इथपर्यंत पोहोचलं. रोज पूजा खेडकर प्रकरणात नवनवीन धक्कादायक अपडेट्स समोर येत आहेत. याच मुद्द्यांवर पंतप्रधान कार्यालय आणि मसूरी येथील लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकर यांची चौकशी सुरू केली आहे. पूजा खेडकर यांचं जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम देखील स्थगित करण्यात आले.
दरम्यान, पूजा खेडकर यांचे आई-वडील देखील याप्रकरणात चांगलेच अडकले आहेत. पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर अटकेमध्ये आहेत. महाडमधून पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना अटक केली होती. शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून त्या फरार होत्या पण सहा दिवसांनंतर त्यांना अटक करण्यात आली. सध्या त्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.