नवी मुंबईत मुसळधार पाऊस
पावसामुळे सीबीडी बेलापूरमध्ये आरबीआय कॉलनीजवळ दरड कोसळली
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगडांचा ढिगारा
खारघरकडे जाणारी वाहतूक तात्पुरती पर्यायी मार्गावर वळवण्यात आली
नवी मुंबई गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पाऊसामुळे दरड कोसळली. रविवारी सीबीडी बेलापूर सेक्टर-5 येथील आरबीआय कॉलनीजवळ मेट्रोच्या पिलरलगत दरड कोसळण्याची घटना घडली. डोंगराचा काही भाग खचल्याने मोठ्या प्रमाणात माती, दगडाचा ढिगारा थेट रस्त्यावर आला. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून परिसरातील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. या घटनेमुळे खारघरकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहतूक वळवण्यात आली.
या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून पूरकडून खारघरच्या दिशेने जाणारी वाहतूक तात्पुरती वळविण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
रस्त्यावर पडलेला माती आणि दगडांचा ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून परिसर सुरक्षित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच दरड कोसळलेल्या भागाची पाहणी करून पुढील धोका टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची नोंद नाही. मात्र, मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात दरड कोसळण्याचा धोका वाढला असून नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, नवी मुंबई शहरामध्ये पर्यटकांची पाऊल पर्यटनस्थळी आणि धबधब्यांच्या दिशेला वळू लागली आहेत. तसेच नवी मुंबई शहरामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. पांडवकडा धबधब्यांवर दोन पर्यटक वाहून गेले होते. या दृष्टीने नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशाने पांडवकडा या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. त्यामुळे पांडवकडा धबधब्यावर कोणी जाऊ नये या दृष्टीने पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.