Summary -
पालघरच्या जंगलात मुंबईतील प्रसिद्ध फुटबॉलपटूचा मृतदेह आढळला
मुंबईतील अंडर-१६ फुटबॉलपटू सागर सोरतीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला
मानसिक तणावाखाली होता अशी माहिती कुटुंबीयांनी दिली
१५ नोव्हेंबरपासून सागर होता बेपत्ता
पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पालघरच्या जंगलामध्ये मुंबईतील प्रसिद्ध फुटबॉलपटूचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पालघरमधील मेंधावन खिंडमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. या फुटबॉलपटूची हत्या झाली ही त्याने आत्महत्या केली अशी चर्चा सुरू आहे. पण त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व मुंबईच्या अंडर- १६ संघाचा फुटबॉलपटू सागर सोरतीचा मृतदेह पालघरच्या जंगलात आढळून आला. जंगलातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सागर दिसला. सागर गेल्या दोन वर्षांपासून मानसिक तणावाखाली होता. तो १५ नोव्हेंबर रोजी पुण्यात फुटबॉल खेळत असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. पण तेव्हापासून तो बेपत्ता होता. काहीच संपर्क होत नसल्यामुळे त्याचे कुटुंबीय खूपच चिंतेत होते.
दोन दिवसांनंतर म्हणजेच १८ नोव्हेंबरला पालघरमधील मेंढावन खिंड जंगलातील एका झाडाला तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या तरुणाच्या मृतदेहाजवळ त्याचा मोबाइल होता. या मोबाइलवरून तो सागर सोरती असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी सागरच्या कुटुंबीयांना संपर्क केला. पोलिसांनी या घटनेमागे आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेची कासा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पोलिस पुढील तपास करणार आहेत.
सागर सोरतीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तो गेल्या दोन वर्षांपासून मानसिक तणावाखाली होता. या महिन्यात त्याच्या धाकट्या भावाचे लग्न होणार होते. या लग्नासाठी त्याने कपडे शिवण्यास नकार दिला होता. तो सतत चिंतेत असायचा. सागरच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या तरुण खेळाडूच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या मृत्यूने क्रीडा क्षेत्रातील अनेकांना धक्का बसला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.