

मुंबईच्या एमएचबी पोलीस ठाण्यात ६.७९ कोटींची दागिने चोरी
१३ ते १४ जानेवारी २०२६ दरम्यान घडली घटना
राजस्थानमधील चार आरोपींना अटक
संजय गडदे, साम टीव्ही
मुंबई शहरातील एम.एच.बी. पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सराफा दुकानातील तब्बल ६ कोटी ७९ लाख ८५ हजार रुपयांच्या (अंदाजे) दागिन्यांच्या चोरीचा गुन्हा अवघ्या ४५ दिवसांत उघडकीस आणण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी राजस्थान राज्यातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजल्यापासून १४ जानेवारीच्या पहाटेपर्यंत अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील तिजोरीतील सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान ऐवज असा एकूण सुमारे ६,७९,८५,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. घटनेची माहिती मिळताच एम.एच.बी. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, कॉल डिटेल रेकॉर्ड, तसेच स्थानिक खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. तपासादरम्यान आरोपींनी चोरीनंतर तात्काळ राज्याबाहेर पळ काढल्याचे समोर आले.
तांत्रिक तपासातून आरोपी राजस्थानमधी विविध भागांत लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांचे पथक राजस्थानमध्ये रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने विविध ठिकाणी छापेमारी करत संशयितांचा शोध घेण्यात आला. २८ जानेवारी २०२६ रोजी पहिल्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सखोल चौकशी आणि माहितीच्या आधारे आणखी तिघांना अटक करण्यात आली.
अटक आरोपींकडून सोन्याचे दागिने अंदाजे ४ कोटी ५० लाख रुपये किंमतीचे, तसेच सुमारे ५ किलो वजनाचे चांदीचे दागिने (अंदाजे १५ लाख रुपये किंमत) असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उर्वरित मुद्देमालाबाबत तपास सुरू असून तोही हस्तगत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
या कारवाईत परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त संदीप जाधव, बोरिवली विभागाचे सहाय्यक पोलीस उपायुक्त संतोष धनावटे आणि एम एच बी कॉलनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हरीश गवळी या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल आव्हाड पी आय गुन्हे, पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील, संदीप गोरडे, वसीम शेख, मंगेश कीरपेकर, संतोष भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संभाजी खरात, पोलीस हवालदार संदीप परीट, बबलू साळुंखे, तिरुपती रेकुलवाड, सतीश देवकर, अर्जुन आहेर, पोलीस शिपाई गणेश शेरमाळे, सचिन मंजुळे, सिद्धेश पाटील, योगेश मोरे,सुनील मस्के, आदित्य राणे आदी तपास पथकात सहभागी होते. आरोपींना न्यायालयात हजर करून पुढील तपासासाठी पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे. या यशस्वी कारवाईमुळे मुंबईतील सराफा व्यावसायिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.