Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, मध्य-पश्चिम रेल्वेवर धावणार २३८ नव्या एसी लोकल

Mumbai Local News : मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गांवर २३८ अत्याधुनिक एसी लोकल धावणार आहेत. १९ हजार कोटींच्या या प्रकल्पांतर्गत आरामदायी गादीयुक्त सीट, मोबाइल चार्जिंग पॉइंट्स आणि अत्याधुनिक एचव्हीएसी प्रणालीसह प्रवासाचा दर्जा उंचावणार आहे.

Alisha Khedekar

  • पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गांवर २३८ अत्याधुनिक एसी लोकल येणार.

  • आरामदायी गादीयुक्त सीट, मोबाइल चार्जिंग पॉइंट्स आणि एचव्हीएसी प्रणालीची सुविधा.

  • लोकल १३० किमी प्रतितास वेगाने धावणार, प्रवासाचा वेळ कमी होणार.

  • भिवपुरी आणि वाणगाव येथे उभारली जाणार दोन नवी ईएमयू कारशेड.

मुंबईकरांच्या प्रवासाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि उपनगरीय रेल्वे व्यवस्थेत अधिक आधुनिक सुविधा आणण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मार्गांवर अधिक सुविधा संपन्न वातानुकूलित लोकल आणण्याच्या योजनेला आता गती मिळाली असून, यासाठीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आठवडाभरात तब्बल २३८ एसी लोकल खरेदीसाठी निविदा काढण्यात येणार आहेत. ही खरेदी मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयूटीपी)–३ आणि ३ए अंतर्गत होणार असून, या योजनेसाठी तब्बल १९ हजार २९३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

नवीन लोकल केवळ वातानुकूलितच नसतील, तर त्यात प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक आधुनिक सुविधा असतील. प्रत्येक डब्यात आरामदायी आसने, अधिक शक्तिशाली एचव्हीएसी प्रणाली, गर्दीनुसार आपोआप तापमान संतुलित करण्याची क्षमता, तसेच मेट्रोप्रमाणे प्रत्येक सीटजवळ मोबाइल चार्जिंग पॉइंट्स असतील. यामुळे दीर्घ प्रवासही सुखदायी होणार आहे. वाढीव विद्युत शक्तीमुळे या लोकल्स १३० किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकतील. या वेगामुळे स्थानकांवरील थांबा आणि दरवाजे उघडणे–बंद करण्यासाठी होणारा वेळ कमी होईल, ज्याचा थेट फायदा वेळेवर धावण्याला मिळेल.

एमयूटीपी–३ अंतर्गत ४७ तर एमयूटीपी–३ए अंतर्गत १९१ लोकल खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. यात १२ डब्यांच्या आणि १५ डब्यांच्या लोकलचे स्वतंत्र पर्याय असतील, ज्यामुळे गर्दीच्या प्रमाणानुसार गाड्या चालवणे सुलभ होईल. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदार निवडण्यासाठी सुमारे तीन ते सहा महिने लागतील. त्यानंतर दोन वर्षांच्या आत पहिली नमुना लोकल तयार होईल आणि तिची चाचणी व मंजुरी प्रक्रिया सुरू होईल.

या मोठ्या प्रकल्पासाठी दोन नवीन ईएमयू कारशेड उभारले जाणार आहेत. मध्य रेल्वेसाठी भिवपुरी आणि पश्चिम रेल्वेसाठी वाणगाव येथे ही कारशेड्स उभारली जातील. विशेष म्हणजे, ज्या कंत्राटदाराला लोकल्सचे कंत्राट मिळेल, त्याच कंपनीकडून या कारशेडचे बांधकाम आणि संचालन करण्यात येईल. यामुळे देखभाल आणि संचालनातील कार्यक्षमता वाढेल.

रेल्वे प्रवाशांच्या दैनंदिन गर्दीच्या ताणातून सुटका करण्यासाठी आणि प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. तज्ज्ञांच्या मते, या आधुनिक एसी लोकलमुळे प्रवाशांचा आराम, प्रवासाचा वेग आणि सुरक्षेचा दर्जा लक्षणीयरीत्या वाढेल. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कला जागतिक दर्जाचे रूप देण्याच्या दिशेने हा एक भक्कम टप्पा मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Cricket News : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

‘नायक नहीं खलनायक है तू'; काँग्रेसचे नेते संजू बाबावर लय संतापले, काय आहे कारण?

Ganesh Naik Vs Eknath Shinde: ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप, नाईक विरुद्ध शिंदे वाद लायकीवर?

Balasaheb Thackeray Death Controversy: बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला? रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

Laxman Hake: मराठा नेते मनोज जरांगेंच्या मागण्यांवर लक्ष्मण हाके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT