मध्य रेल्वेच्या ताफ्यामध्ये लवकरच नवीन एसी लोकल दाखल होणार आहे. या नव्या एसी लोकलच्या डब्याखाली मोटर आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम असणार आहे. त्यामुळे या लोकलमध्ये प्रवाशांना वसण्यासाठी जास्त जागा मिळणार आहे आणि त्यांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. या एसी लोकलचे डिझाइन असे करण्यात आले आहे ज्यामुळे सीट्स जास्त असणार आहे आणि प्रवाशांना उभं राहण्यास देखील जास्त जागा मिळणार आहे. ही नवीन एसी लोकल उन्हाळ्याच्या सुरुवातीला सुरू होण्याची अपेक्षा आहे. या नव्या एसी लोकलमध्ये मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार आणि सुखकारक होणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावर आगामी काळात धावणारी नवीन एसी लोकल खूपच आकर्षक आहे. निळ्या आणि चंदेरी अशा आकर्षक रंगामध्ये ही लोकल आहे. ही नवीन एसी लोकल सध्या कुर्ला कारशेडमध्ये उभी आहे. याठिकाणी तिची चाचणी आणि तपासणी केली जात आहे. रेल्वे कर्मचारी या नव्या एसी लोकलच्या आतील भागांची आणि सिस्टीमची बारकाईने तपासणी करत आहेत. डब्यांच्या खाली असलेल्या मोटर्समुळे प्रवाशांसाठी डब्यांमध्ये अतिरिक्त जागा मिळणार आहे.
या नव्या एसी लोकलमध्ये दोन्ही टोकाला महिलांसाठी डबे असणार आहेत. महत्वाचे म्हणजे यामध्ये फर्स्ट क्लासचा डबा नसणार आहे. इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक दरवाजे, प्रवासी टॉक बॅक सिस्टम असणार आहे. त्याचसोबत प्रवाशांच्या वाढीव सुरक्षेसाठी प्रत्येक डब्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलमध्ये आधीच लागू केलेली अंडरस्लंग सिस्टम लोकलची स्थिरता वाढवते आणि यामुळे लोकलमध्ये जास्त जागा मिळते. मध्य रेल्वेला नोव्हेंबर २०२४ मध्ये ही नवी एसी लोकल मिळाली. जी मध्य रेल्वेच्या ताफ्यातील एक महत्त्वपूर्ण भाग असणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, नवीन एसी लोकलमध्ये १,११६ प्रवासी बसण्याची क्षमता आहे. आधीच्या एसी लोकलच्या मॉडेलमध्ये फक्त १,०२८ प्रवाशांना बसण्याची व्यवस्था आहे. तर या लोकलमधून ४,९३६ प्रवासी उभं राहून प्रवास करू शकणार आहेत. या नव्या लोकलमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अपग्रेड केलेल्या तंत्रज्ञानाची व्यवस्था आहे.
एसी लोकलच्या वाढत्या मागणीमुळे मध्य रेल्वे सातव्या एसी लोकलची भर घालून आपल्या ताफ्याचा विस्तार करत आहे. ही एसी लोकल गेल्या दोन वर्षांतली पहिली नवीन एसी लोकल असणार आहे. सध्या मध्य रेल्वे मार्गावर ६ एसी लोकल धावतात ज्यापैकी पाच रोटेशनल आधारावर दररोज सेवेत असतात. या एसी लोकल दिवसाला ६६ फेऱ्या देतात. ही नवीन एसी लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात आल्यानंतर सुरळीत ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी आणि देखभालीमुळे होणारे व्यत्यय कमी करण्यासाठी बॅकअप म्हणून काम करेल.
महत्वाचे म्हणजे पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वे मार्गावर ट्रॅक कमी उंचीवर आहेत. ज्यामुळे मुसळधार पावसात त्यांना पुराचा धोका जास्त असतो. दैनंदिन सेवेत येण्यापूर्वी कोणत्याही संभाव्य समस्या सोडवण्यासाठी अधिकारी ट्रेनच्या कामगिरीवर लक्ष ठेवत राहतील. पावसाळ्यात या एसी लोकलचे नुकसान होण्याची शक्यता आहे कारण या नव्या एसी लोकलच्या खाली असणाऱ्या मोटर प्लेसमेंटमध्ये पाणी जाऊन अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आतापर्यंत मध्य रेल्वेने अंडरस्लंग सिस्टम लोकल चालवणे आतापर्यंत चालवल्या नव्हत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.