प्रत्येक भूखंडाची एक क्षमता असते आणि एक दिवस विस्फोट होणारच होता आणि अजून बरंच काही घडायचंय. त्या दिवशी जे घडलं ते फार आधीपासूनच घडत आलंय. बातम्या फक्त आत्ता झाल्यात.
सोमवार... आठवड्याचा पहिला दिवस उजाडला. उठल्यावर काय आदल्या रविवारच्या रात्री झोपतानाच हा विचार मनात आला होता की उद्या सोमवार आहे आणि आपल्याला वेळेत सुरक्षित पोहोचायचंय. वेळेत पोहोचायचंय, तोपर्यंत ठीक आहे पण सुरक्षित? हा विचार कसा आला डोक्यात? याची सुरुवात कशी झाली आणि कधी हा विचार सर्वात आधी माझ्या डोक्यात आला हेच मला आठवत नाहीये. तुमचा फर्स्ट क्लासचा पास असो किंवा एसी ट्रेनचं तिकीट. आता याने काही फरक पडत नाही.
कारण मरण इतकं सोपं झालंय की तुमच्या सोयी-सुविधांच्या डोलाऱ्यात ते सगळं झाकलं जातंय. १०-१२ लोक धावत्या लोकलमधून पडतात आणि त्यातले ६ जण दगावतात, याच्या दोन दिवस बातम्या चालतात, विरोधक- सत्ताधारी भिडतात आणि आपण पुन्हा कामावर जातो, नव्याने अपघातासाठी सज्ज होतो. रुटीनमध्ये यावर विचार करायला सुद्धा आपल्याला वेळ नाहीये.
आज ऑफिसला पोहोचतानाच समजलं होतं, आपल्या ट्रेनच्या वेळात मागे पुढे असणारीच ट्रेन होती ती ज्यातून १० लोक पडले. आपण वाचलो बाबा! पण आपण इतके स्वार्थी आहोत? आपल्यात भावना नाहीत? विचारही व्यक्त करायला वेळ नाही? प्रश्न विचारायला यंत्रणेतला माणूस नाही? उत्तरं मागायला सवड नाही, असो आज वाचलो ना बस्स!
बुलेटिन वाचताना त्रास झाला पण किती वेळ? पुढचा नवा अपघात होईपर्यंत. रोज त्याच ट्रेनने यायचंय आणि तसाच प्रवास करायचाय. रोज पाहतेय. सारखीच गर्दी, सारखेच लोंढे, ट्रेनचं वेळापत्रकही तेच, यंत्रणा पण तीच, सगळं तेच. बदलल्या फक्त वेळा. या वेळा माणसांच्या डोक्यातल्या विचारांच्या. यंत्रणा पुढच्या पडणाऱ्या माणसांची वाट पाहतेय हे खरं असलं तरी आपण पण किती बोथट आहोत, मुर्दाड यंत्रणा दर दिवसाला ८ लोकांचा बळी घेतेय आणि आपण गुंगीत पुढचं आयुष्य जगतोय. समोरचा काळोख स्वीकारून स्वतःची लायकी एक यंत्रापेक्षा कमी समजून गपगुमान जगतोय. मुंबईचा माणूस असाच जगतोय. अलिखीत करार आहे हा - असंच जगा अन्यथा बाजूला व्हा!
हे सगळं इतकं भीषण होत चाललंय की याचा अजून मोठा स्फोट व्हायचाय. गर्दी करणारी पण माणसंच, मरणारी पण माणसंच, यंत्रणा चालवणारी पण माणसंच, बातम्या करणारी पण माणसंच आणि भावनाशून्य राहून रोजचा सूर्य बघणारी पण माणसंच!
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.