संजय गडदे | मुंबई प्रितिनिधी | साम टीव्ही मराठी
Mumbai crime news today : अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत महिलांची फसवणूक करणाऱ्या एका भोंदू फकीराला कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. इरफान नियाज अहमद (वय ३४) असे या आरोपीचे नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील बहराइच येथील रहिवासी आहे. गेल्या काही वर्षांपासून तो मुंबईत राहत होता आणि स्वतःची "फकीर बाबा" अशी ओळख त्याने निर्माण केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांच्या वैयक्तिक अडचणी आणि कौटुंबिक समस्यांचा फायदा घेऊन त्यांच्याशी संपर्क साधत असे. त्यानंतर "दोष निवारण", "उपचार" किंवा "विशेष विधी" करण्याच्या नावाखाली तो महिलांचा विश्वास संपादन करत असे.
कांदिवली परिसरातील एका महिलेच्या बाबतीतही त्याने अशाच प्रकारचा गुन्हा केल्याचा आरोप आहे. संबंधित महिलेच्या पतीच्या निधनाबाबत आपल्याला माहिती असल्याचे भासवून, त्याने महिलेला तिच्यावर काही "दोष" असल्याचे सांगितले. तो दोष दूर करण्यासाठी विशेष विधी करावा लागेल, असे सांगून त्याने महिलेचा विश्वास जिंकला.
यानंतर आरोपीने त्या महिलेसह तिच्या दोन मुलींना विधीच्या नावाखाली एकत्र बसवले. या विधीदरम्यान तिघींनाही गुंगीचे पदार्थ देऊन बेशुद्ध केल्याचा आरोप आहे. तिघीही शुद्ध हरपल्यानंतर आरोपीने त्यापैकी एका मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७८, १२३ तसेच ३(२) अंतर्गत एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर १३ एप्रिल रोजी आरोपीला अटक करण्यात आली.
सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारे इतर महिलांची फसवणूक केली आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांनी अशा भोंदू व्यक्तींपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.