मेगापॉलिस मेटाव्हर्स प्रकल्पाच्या मदतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यात येत आहे. मुंबईत सुरु असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणि डिजिटल प्रकल्पाद्वारे सन 2025 पर्यंत मुंबईचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि मुंबई मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या सहकार्यातून स्वप्नातील मुंबई साकार करणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे पर्यटन विभाग, सिडको, मुंबई महापालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई मेट्रो आणि मुंबई मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या माध्यमातून आयोजित मुंबई टेक विक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
फडणवीस म्हणाले की, मुंबईमध्ये कोस्टल रोड, मेट्रोसह पायाभूत सुविधांचे विविध प्रकल्प सुरु आहेत. मुंबई बदलत आहे, याचा नागरिकांना अनुभव येत आहे. शहरातील वाहतूक आणि प्रदूषण समस्याही दूर करण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. कोस्टल रोडचे काम पूर्णत्वास आले असून पुढील महिन्यात नागरिकांच्या सेवेसाठी सुरू होईल. मुंबईला बदलण्यासाठी मेट्रो तीन प्रकल्प आणि सर्वात लांब भुयारी मेट्रोही प्रगतीपथावर आहे. प्रत्येक मुंबईकराला भविष्यातील मुंबई पाहून आनंद वाटेल. ऑक्टोबरमध्ये नवी मुंबई विमानतळाच्या माध्यमातून चार प्रकल्प लवकरच सुरु होतील. 2014 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्योगपतींची बैठक घेतली होती. त्यामुळे अनेक उद्योग मुंबईत आले आता मात्र मुंबईत उद्योगांसाठी जागा अपुरी पडत आहे. मुंबईत अपुऱ्या जागेमुळे नवीन महामार्ग बनवू शकत नसल्याने मेट्रोचे जाळे तयार करीत आहोत. (Latest Marathi News)
अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई जोडण्याचे काम झाले असून कमी वेळात वेगाने पोहोचता येत आहे. नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढत असून तिसरी मुंबई तयार होत आहे. कोस्टल रोडसुद्धा अटल सेतूला जोडला गेल्याने नवी मुंबईचे अंतर कमी झाले आहे. अटल सेतू, कोस्टल रोड, कॉरिडॉर, भुयारी मेट्रो, टनेल यामुळे मुंबईतून एका तासात कुठेही जाता येणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. सध्या 11 किमी भुयारी मेट्रो आहे, ती पुढील तीन वर्षात 375 किमी करण्याचा प्रयत्न आहे. पुढच्या पाच वर्षात मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यासाठी विकास कामे सुरू आहेत.
स्टार्ट अप आणि इको सिस्टीममुळे युवक बंगळुरू, हैदराबादकडे जात होते. आता महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर येथे स्टार्टअप कार्यान्वित केले आहे. 2016 ला देशाला आकर्षित करेल अशी स्टार्टअप पॉलिसी राज्याने तयार केली. शिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा सेंटर तयार करीत आहे. अॅमेझॉन, गुगल या कंपन्यांशी गुंतवणुकीबाबत चर्चा झाली आहे. गुगलशी पुण्यात सामंजस्य करार झाला आहे. पुणे वेगाने तंत्रज्ञान शहर बनत असून नागपूर, पुणे, मुंबईत तंत्रज्ञान कंपन्या गुंतवणूक करण्यास पुढे आल्या आहेत. यामुळे महाराष्ट्राचा युवक इतर राज्यात नोकरीला जाणार नाही, असंही फडणवीस म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.