मुंबई विमानतळाबाहेर प्रवाशाची मोठी फसवणूक
टर्मिनल १ ते २ प्रवासासाठी प्रवाशाला गंडा घातला
सहार पोलिसांनी आरोपीला केली अटक
मुंबई एअरपोर्टबाहेर हातचलाखीने फसवणूक
मुंबईतून प्रवाशाची फसवणूक करण्यात आल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात टर्मिनल-1 ते टर्मिनल-2 असा अवघ्या 4 किलोमीटरच्या प्रवासासाठी प्रवाशाकडून तब्बल 2 हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी सहार पोलिसांनी मुश्ताक शेख या सराईत आरोपीला नवी मुंबईतल्या तळोजा येथून अटक केली. या घटनेनंतर पोलिसांनी प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
सायन परिसरात गारमेंट व्यवसाय करणारे ओबेदुल्लाह अब्दुल्लाह शाह (वय 33 वर्षे) हे 26 मे रोजी पहाटे लखनौला जाण्यासाठी विमानतळावर आले होते. ते टर्मिनल-1 येथे पोहोचल्यावर त्यांचे विमान टर्मिनल-2 वरून उड्डाण करणार असल्याचे समजले. त्यामुळे घाईत असताना डिपार्चर गेटसमोर उभ्या असलेल्या कारमधील दोन जणांनी त्यांना “टर्मिनल-2 ला जायचे आहे का?” अशी विचारणा करत गाडीत बसवले.
काही अंतर गेल्यानंतर आरोपींनी थेट 816 रुपये भाडे सांगितले. त्यानंतर “इमर्जन्सी चार्ज”च्या नावाखाली आणखी पैसे मागत शाह यांच्याकडून १ हजार रुपये घेतले. टर्मिनल-2 वर पोहोचल्यानंतर शाह यांनी चालकाला दोन 500 रुपयांच्या नोटा दिल्या. मात्र चालकाने हातचलाखी करत त्यांच्या समोर 100 रुपयांच्या दोन नोटा दाखवत “इतके कमी पैसे का देता?” असा सवाल केला. गोंधळलेल्या शाह यांनी पुन्हा दोन 500 रुपयांच्या नोटा दिल्या.
यानंतर लखनऊचे पहिले विमान चुकल्यामुळे शाह पुन्हा टर्मिनल-1 येथे परतले. त्यावेळी पाकीट तपासताना आपली 2 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ सहार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान सहार पोलिसांनी आरोपी मुश्ताक शेखला तळोजा येथून अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीवर मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीने अशाच प्रकारे आणखी किती प्रवाशांना गंडा घातला आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, दादर आणि माटुंगा रेल्वे स्थानक परिसरात घडणाऱ्या हातचलाखीच्या घटना आता विमानतळ परिसरापर्यंत पोहोचल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. प्रवाशांनी अधिकृत टॅक्सी सेवाच वापराव्यात आणि व्यवहार करताना नोटा समोर मोजून द्याव्यात, असे आवाहन विमानतळ पोलिसांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.