विरार : काही दिवसांपूर्वी अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज मीरा रोडमध्ये मराठी भाषिकांनी मोर्चा काढला आहे. मीरा रोडमधील मराठीद्वेष्ट्यांना मोर्चातून प्रत्युत्तर देण्यात आलं. या मोर्चात शिवसेना उबाठा आणि मनसेची एकी पाहायला मिळाली. शिवसेना उबाठा आणि मनसेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या मोर्चात प्रचंड संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सगळ्याच नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि स्थानिक आमदार, खासदारांवर तुफान हल्ला चढवला.
गेल्याच आठवड्यात मीरा रोडमध्ये एका अमराठी दुकानदाराला मारहाण झाली. मराठी भाषेत न बोलल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानदाराला चांगलाच चोप दिला होता. या मारहाणीविरोधात परिसरातील व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसे, शिवसेना उबाठा, मराठी एकीकरण समिती आज रस्त्यावर उतरली. पोलिसांनी धरपकड करुनही हजारो मराठी भाषिक रस्त्यावर उतरले. या मोर्चाला शिवसेना उबाठा आणि मनसेच्या नेत्यांनी संबोधित केलं. 'मीरा रोडमध्ये मराठी न बोलणाऱ्या दुकानदाराला मारहाण झाली, तेव्हाच मी म्हटलेलं होतं, इथे व्यापार करायला आलात, तर व्यापार करायचा. मराठी माणसाचा बाप बनायचा प्रयत्न नाही करायचा', अशा शब्दांत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मराठीद्वेष्ट्यांना सुनावलं. 'मराठीचा अपमान कराल, तर कानाखाली बसेल', असा थेट इशारा देशपांडे यांनी दिला.
'दोन हजार मैलांवरुन इथे येऊन दादागिरी नाही करायची. इथे काय होणार ते आम्ही ठरवणार, इथला मराठी माणूस ठरवणार. इथे धंदा करायला आलात ना, तर धंदा करा. इथल्या राजकारणात लुडबूड नाही करायची. चड्डीत राहायचं. इथे येऊन माज नाही दाखवायचा', अशा शब्दांत देशपांडे यांनी स्थानिक आमदार नरेंद्र मेहता इशारा दिला.
दरम्यान, हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी मोर्चापूर्वीच ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर मराठी नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत मोठं आंदोलन केलं. पोलिसांनी सोडल्यानंतर अविनाश जाधव यांनी थेट मीरा रोड गाठलं आणि आंदोलकांमध्ये सहभागी झाले. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका करत त्यांना इशारा दिला. 'महाराष्ट्रात कुठेही मराठी माणसासोबत काही घडलं तर असेच मोर्चे निघतील याची सरकारने दखल घ्यावी', असा इशारा अविनाश जाधव यांनी यावेळी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.