मनोज तांबे, साम टीव्ही प्रतिनिधी
Mira Bhayandar voter list 2 lakh names deleted after SIR : राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केले आहेत. मीरा-भाईंदर महानगरपालिकेत भाजपने बोगस मतदारांच्या जीवावर सत्ता मिळवली, असा दावा सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच सरनाईकांचा दावा 'हास्यास्पद' असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने नुकत्याच केलेल्या SIR मोहिमेनंतर मीरा-भाईंदर आणि ओवळा-माजीवडा मतदारसंघातून तब्बल २ लाख बोगस मतदारांची नावे कमी करण्यात आली आहेत. मतदार यादीतील तब्बल ५५% नावे ही बोगस किंवा बनावट होती आणि याच मतदारांच्या जोरावर भाजपने पालिका निवडणुकीत विजय मिळवला, असा थेट घणाघात सरनाईक यांनी केला.
मंत्री सरनाईकांच्या आरोपानंतर भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यातील मदभेद पुन्हा समोर आले आहेत. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईक यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सरनाईक स्वतः आणि शिवसेनेचे खासदारही याच मतदार यादीच्या आधारे निवडून आले आहेत, मग ते स्वतःही बोगस मतांनी निवडून आले का? असा सवाल विचारत त्यांनी जोरदार पलटवार केला आहे.
मीरा-भाईंदरमध्ये तब्बल ५५% मतदान बोगस; सरनाईक यांचा गंभीर आरोप
मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर फसवणूक आणि बोगस मतदान झाल्याचा आरोप राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. निवडणूक याद्यांमधील गोंधळ आणि प्रशासकीय निष्काळजीपणामुळेच आपला पराभव झाला, अन्यथा आमचा विजय निश्चित होता, असा दावा सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
प्रताप सरनाईक म्हणाले, निवडणुकीच्या काळात झालेल्या गोंधळामुळे आणि या फसवणुकीमुळे आमच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. आमचा विजय झालेलाच होता, पण या चुकीच्या गोष्टींमुळे जनतेला आणि उमेदवारांना फसवलं गेलं. मात्र, या सगळ्याला आमची लोकंही तितकीच जबाबदार आहेत, कारण त्यांनी या मतदार याद्यांवर वेळेत योग्य ते लक्ष दिले नाही.
आकडेवारी मांडत सरनाईक यांनी केले मोठे खुलासे:
एकूण बूथ: ४८७
एकूण मतदार: ५ लाख ६७ हजार ९७२
नॉट मॅपिंग मतदार: १ लाख ४२ हजार ६५२ मतदारांचे मॅपिंग झालेले नाही.
मॅपिंग झालेले मतदार: १ लाख ४८ हजार ४०७ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे.
मीरा-भाईंदर विधानसभा (१४५):
एकूण मतदार: ५ लाख १४ हजार ९५० मतदार होते.
ड्राफ्ट भरल्यानंतर ५ लाख १४ हजार मतदारांपैकी तब्बल २ लाख ४५ हजार मतदार कायमस्वरूपी वगळण्यात आले आहेत. म्हणजेच हे सर्व मतदार पूर्णपणे बोगस होते, असा थेट आरोप सरनाईकांनी केला.
४७ हजार ९०१ लोकांनी अर्ज दाखल केले असून त्यांचे मॅपिंग बाकी आहे. यावर सुनावणी होणे अद्याप बाकी आहे, यामध्येही बहुतांश मतदार बोगस असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
५५% मतदान बोगस असल्याचा दावा
एसआरआयच्या (SIR) अहवालाचा हवाला देत सरनाईक म्हणाले की, ४ लाख १४ हजारांपैकी केवळ ३ लाख १ हजार मतदारच वैध ठरले असून, २ लाख १३ हजारांहून अधिक मतदार पूर्णपणे बाद झाले आहेत. याचाच अर्थ एसआरआयच्या नोंदणीवरून तब्बल ५५% मतदान हे बोगस असल्याचे आता सिद्ध झाले आहे. सरनाईकांच्या आरोपांनी स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.