कल्याण-डोंबिवलीत मोठी राजकीय घडामोड
विकास म्हात्रे आणि रविंद्र चव्हाण यांची बैठक
दोन्ही नेत्यांच्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याण: राजकारणात कायमचा कोणी शत्रू नसतो,याचा प्रत्यय पुन्हा एकदा डोंबिवलीतील राजकारणात पाहायला मिळालाय. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांच्यातील दुराव्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. या दोघांनीही विकासासाठी एकत्र लढण्याचा निर्धार केलाय.
डोंबिवली पश्चिमेत भाजपकडून अपेक्षित विकास निधी मिळत नसल्याची नाराजी विकास म्हात्रे यांनी दर्शवली होती. त्यानंतर विकास म्हात्रे यांच्यासहित त्यांची पत्नी कविता म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आमदार रवींद्र चव्हाण यांनी विकास म्हात्रे यांच्या मतदारसंघात विविध विकास कामांचे उद्घाटन केले. कुंभारखाना पाडा येथील मंदिर कमानीच्या कामावरून दोन्ही गटांतील समर्थकांमध्ये तणाव झाला होता. यावेळी कविता म्हात्रे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार चव्हाण यांच्यासमोर घोषणाबाजी करत गोंधळ घातला होता.
वादाच्या पार्श्वभूमीवर विकास म्हात्रे यांच्या जागेवर इतर उमेदवारांना संधी मिळावी, यासाठी भाजपने युवासेना पदाधिकारी अनमोल म्हात्रे आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला होता. मात्र सत्ताधारी महायुतीचा अंतिम निर्णय होताच कविता म्हात्रे, विकास म्हात्रे, प्रकाश भोईर तसेच अश्विनी अनमोल म्हात्रे यांना एकाच पॅनलमधून उमेदवारी देण्यात आलीये. तरीही विकास म्हात्रे यांची नाराजी आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावरील आरोप-प्रत्यारोप सुरूच राहिल्याने महायुतीच्या चारही उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जातेय.
वस्तुस्थिती लक्षात घेऊन काल रात्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत सर्व मतभेद विसरून प्रलंबित विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते आणि परिसरातील मूलभूत सुविधांची माहिती घरोघरी जाऊन नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महायुतीतून योग्य विकास निधी निश्चितपणे मिळेल, असे स्पष्ट आश्वासन देण्यात आलंय.
बैठकीनंतर आज विकास आणि कविता म्हात्रे उमेदवारी अर्जांच्या छाननीसाठी निवडणूक कार्यालयात उपस्थित होते. यावेळी त्यांच्या शर्टवर धनुष्यबाणासोबतच कमळ चिन्हही दिसून आलं. त्यामुळे राजकीय एकजुटीचे स्पष्ट संकेत मिळालेत.
यानंतर विकास म्हात्रे म्हणाले, नागरिकांच्या विकासासाठी आम्ही आता एकत्र लढत आहोत. बैठकीत नागरिकांचा रोष व्यक्त झाला होता. मात्र पाणी, रस्ते आणि प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्णय झालाय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रभागासाठी योग्य विकास निधी मिळेल, असा विश्वास आहे. एकंदरीत, डोंबिवली पश्चिमेत दीर्घकाळ सुरू असलेली नाराजी बाजूला ठेवून महायुती निवडणुकीच्या रणांगणात उतरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.