गिरीश निकम, साम टीव्ही
विधान परिषद निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. त्यामागे उद्धव ठाकरेंची नाराजी असल्याचाही चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत रायगड, मावळमध्ये ठाकरे गटाला जयंत पाटलांची मदत मिळाली नसल्यानं त्याचा वचपा काढल्याची चर्चा आहे. लोकसभेनंतर विधान परिषदेची निवडणुकही चुरशीची झाली.
या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीची 12 मते होती. काँग्रेस, शेकाप आणि माकप यांच्या मदतीने जयंत पाटील पुन्हा विजयी होतील अशी शक्यता होती. मात्र जयंत पाटील यांना 12 मते मिळाली.
काँग्रेसने आपल्याला मदत केली नाही, असा आरोप जयंत पाटील यांनी निकालानंतर केला. तर सत्ताधा-यांनी मविआच्या नेत्यांवर निशाणा साधलाय. एकेकाळी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचा आता शेवट होतो आहे का असं चित्र आहे. कारण शेकापचे आता श्यामसुंदर शिंदे हे एकमेव आमदार आहेत.
विधानसभेत संख्याबळ नसतानाही विधान परिषद निवडणूक जिंकण्याचा करिष्मा जयंत पाटील करून दाखवत असे. मात्र यंदा जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. तीन दशकानंतर त्यांची विधीमंडळातून एक्झिट झाली आहे. महाविकास आघाडीकडे दोन उमेदवार निवडून येतील, एवढीच मते होती. पण, ऐनवेळी शिवसेनेनं (ठाकरे गट) मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली.
त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली होती. जयंत पाटलांना ठाकरे गटाची नाराजी भोवल्याची चर्चा आहे. कारण कोकण पट्ट्यातील रायगड आणि मावळ मतदारसंघात शेकापची अर्थात जयंत पाटील यांची ताकद आहे. लोकसभेला शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवारांना जयंत पाटलांकडून अपेक्षित अशी मदत मिळाली नाही.
जयंत पाटील यांनी आपल्याला मानणारी जवळपास लाखभर मते सुनील तटकरेंकडे फिरवल्याची चर्चा आहे. त्यामुळे रायगडमध्ये अनंत गिते आणि मावळात संजोग वाघेरे यांना पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. हीच खंत ठाकरे गटाच्या मनात होती.
त्यामुळेच ऐनवेळी विधान परिषदेच्या निवडणुकीत मिलिंद नार्वेकर यांना ठाकरे गटानं उतरवून वचपा काढला, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. लोकसभेसारखा विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवायचा असेल तर मविआला अंतर्गत मतभेदांची दरी कमी करण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.