लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आगामी विधानसभेपूर्वी महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. मोठ्या थाटामाटात या योजनेची सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत दीड कोटींहून अधिक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय. मात्र, योजनेचे श्रेय घेण्यावरून महायुतीत चांगलीच जुंपली आहे. दिवाळीपूर्वीच महायुतीतल्या घटकपक्षात वादाचे फटके फुटण्यास सुरुवात झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी महायुतीने कॅबिनेटची बैठक बोलावली होती. या बैठकीत लाडकी बहीण योजनेवरून चांगलाच वाद झाल्याचं पाहायला मिळालं. दादांचा वादा आणि जाहिरातीवर शिंदे गटानं (Eknath Shinde) आक्षेप घेतला. शंभूराज देसाई आणि दादा भुसे यांनी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरून अजित पवार एकटेच कसे श्रेय घेऊ शकतात असा सवाल उपस्थित करत कॅबिनेट बैठकीत हंगामा घातला.
दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटातील नेतेही बैठकीत चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात शिंदे गटाने अनाथांचे नाथ बॅनर्स लावले. मग तो श्रेयवाद नव्हता का? असा सवाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उपस्थित केला. यामुळे कॅबिनेट बैठकीत मोठा तणाव निर्माण झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घेत हा वाद मिटवल्याची माहिती आहे. आता यापुढे कुठेही कार्यक्रम घेत असताना महायुती म्हणून सर्वांना फायदा होईल असे सरकारी योजनेचे पोस्टर लावण्यात यावे, असं महायुतीतील तिन्ही घटकपक्षात ठरल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. ज्या योजनेचे जे नाव आहे तसेच पोस्टर लावा जेणेकरून वाद निर्माण होणार नाही आणि सर्वांना फायदा होईल असा सल्लाही बैठकीत देण्यात आल्याचं कळतंय.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आजपर्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात १ कोटी ५९ लाख भगिनींना ४७८७ कोटींचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. जुलै आणि ऑगस्ट अशी एकत्रित ३ हजार रुपयांची रक्कम डीबीटी द्धारे थेट खात्यात जमा करण्यात आली आहे.
या योजनेत अडीच कोटी महिला लाभार्थींना लाभ देण्याचे उद्दीष्ट आहे. त्यामुळे अर्ज घेण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत चालू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. नवी मुंबई येथे अर्ज भरतांना केलेल्या गैरप्रकारासाठी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्याची माहिती यावेळी देण्यात आली.
त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला आता मुदतवाढ दिली असून ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच हा अर्ज भरल्यानंतर ज्यांचे अर्ज सप्टेंबर 2024 आधी भरले आहेत, त्यांच्या खात्यात थेट साडेचार हजार रुपये म्हणजे तीन महिन्यांचे पैसे एकत्र येणार आहेत. कालच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.