महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता १२ दिवस झाले तरी देखील राज्यात सरकार स्थापन झाले नाही. महायुतीमध्ये मंत्रिपदाच्या वाटपावरून नाराजीनाट्य सुरू आहे. अशामध्ये आज महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. सत्ता स्थापनेचा दावा करण्यापूर्वी भाजपच्या गटनेत्याची निवड केली जाणार आहे. यासाठी भाजपच्या विधिमंडळ नेत्यांची बैठक होणार आहे. गटनेता पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचेच नाव निश्चत असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचा गटनेता कोण असणार हे आज ठरणार आहे. यासाठी थोड्याच वेळात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी भाजपचे नेते विधानभवनात दाखल होत आहेत. केंद्रीय निरीक्षकही थोड्याच वेळात बैठकीला पोहचणार आहेत. या बैठकीसाठी भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी, निर्मला सीतारमण हे कालच मुंबईत दाखल झाले आहेत. भाजपच्या गटनेता निवडीनंतर सत्तास्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस देखील विधानसभावनाकडे रवाना झाले आहेत.
महायुतीमध्ये मंत्रिपदाच्या वाटपावरून वाद सुरू होता. गृहमंत्रिपदावर भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आग्रही होते. भाजपने गृहमंत्रिपद मिळावे अशी मागणी केली होती. तर एकनाथ शिंदे हे देखील गृहमंत्रिपदावर ठाम होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी निर्णय बदलला असल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी निर्णय बदलला. उपमुख्यमंत्रिपद स्विकारण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद स्विकारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिली आहे. एकनाथ शिंदे यांना गृह खात्याऐवजी नगरविकास आणि आणखी एखादे महत्वपूर्ण खाते दिले जाणार आहे. उद्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसोबत २० हुन अधिक मंत्री देखील शपथ घेणार आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही महत्वपूर्ण माहिती दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.