Congress Slams On Maharashtra Government : राज्य सरकार कॅसिनो सुरू करून तरुण पिढीला बर्बाद करण्याचे पाप करत आहे. काँग्रेस पक्षाचा राज्यात कॅसिनो सुरू करण्यास विरोध राहील, अशी आक्रमक भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली.
महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Monsoon session 2023) पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी शिंदे सरकारला घेरले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्थगन प्रस्ताव आणला होता; पण सरकारने शेतकरी प्रश्नांवर बोलू दिले नाही. बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पण सरकार फक्त कडक कायदा करू म्हणत वेळ मारून नेत आहे. राज्यातील सरकार शेतकरीविरोधी असून शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे सरकार आहे, असा घणाघातही नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.
विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले की, शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नावर राज्य सरकारने विरोधकांना बोलू दिले नाही, आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही असे सांगत आहेत. बोगस बियाणांमुळे (Seeds) कापसाचे पीकच आले नाही, पिक वाया गेले व वर्षही वाया गेले. मागील वर्षाचा कापूस अजूनही शेतकऱ्याच्या घरात पडून आहे; पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही.
राज्यातील तिघाडी सरकार (Government) शेतकरीविरोधी आहे. शेतकरी व जनतेला लुटण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा सरकारने केली. पण अजून मदत मिळालेली नाही. जनतेच्या प्रश्नावर सरकारने उत्तर दिले पाहिजे. पण बहुमताच्या जोरावर राज्य सरकार उत्तर देण्यापासून पळ काढत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
जनतेने काँग्रेसवर विरोधी पक्षाची जबाबदारी सोपवली असून काँग्रेस पक्ष विरोध पक्षाची जबाबदारी योग्य रितीने पार पाडत सरकारला जाब विचारत राहील, सभागृहात बोलू दिले नाही तर रस्त्यावर संघर्ष करू, असा इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावण्याचे पाप भाजप सरकारने केले आहे, अशी टीका करतानाच तरुणांच्या हाताला काम नाही, बरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना राज्य सरकार गोव्याच्या धर्तीवर कॅसिनो सुरू करण्याचे पाप करत आहे, असे पटोले म्हणाले.
आधीच किराणा दुकानात बीअर विकण्यास परवानगी दिलेली आहे, मुंबईसह राज्यात डान्स बारचा सुळसुळाट आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार कॅसिनो सुरू करून तरुण पिढीला बरबाद करण्याचे पाप करत आहे. काँग्रेस पक्षाचा राज्यात कॅसिनो सुरू करण्यास विरोध राहील. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सकाळी विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, असेही पटोले म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.