राज्यभर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम
सिंहगड, कुसगाव खिंड आणि वरंधा घाट परिसरात दरडी कोसळल्याच्या घटना
रत्नागिरी-नागपूर महामार्गावर दरड कोसळल्याने काही मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम
सुनील पाटकर, महाड
राज्यभरात गेले ३ ते ४ दिवस पावसाने दमदार बॅटिंग केली आहे. जून महिन्यात काहीसा शांत असलेल्या पावसाने जुलै महिना सुरु होताच धुमाकूळ घातला आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. दरम्यान सलग धो-धो पडणाऱ्या पावसाने काही जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत केलं आहे. पुण्यातील मुख्य घाटात दरड कोसळून रस्ते बंद करण्यात आले आहेत. पुण्यातील सिंहगड किल्ला, कुसगाव खिंड मार्ग आणि वरंधा घाट परिसरात दरड कोसळली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
किल्ले सिंहगडावरील पायरी मार्गावर पहिल्या दरवाज्याजवळ दरड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सध्या सिंहगड परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पायऱ्यांचा मार्ग निसरडा झाल्याने आणि दरडी कोसळण्याचा धोका वाढल्याने किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे सांगण्यात आले.दरम्यान सुरक्षिततेसाठी सिंहगड बंद ठेण्यात आला आहे.
दरम्यान, खेडशिवापूर ते राजगड तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या कुसगाव खिंड मार्गावरही मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. दरड रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले दगड आणि माती हटविण्यात आली आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या घटनेत कोणतीही मोठी दुर्घटना घडली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
याचबरोबर भोर तालुक्यातील वरंधा घाट परिसरातही पावसाचा जोर वाढत असून शिरगाव हद्दीत आज सकाळी दरड कोसळल्याची घटना घडली. महामार्ग विभागीय अभियंता राहुल कुलकर्णी यांनी संबंधित ठेकेदारांना तातडीने दरड हटविण्याच्या सूचना दिल्या असून प्रशासनाची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. वरंधा घाट पुणे मार्ग रस्ता नव्याने राष्ट्रीय मार्ग म्हणून घोषित झाल्यानंतर या ठिकाणी रुंदीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे मागील काही दिवस हा रस्ता अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. तरीही या रस्त्यावरून वाहतूक सुरू होती, मात्र आजपासून सतर्कतेच्या दृष्टीने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - नागपूर महामार्गांवरील दक्खन ते कळकदारा यांच्यामध्ये महामार्गांवर दरड कोसळण्याचे प्रकार सुरु असून आज सकाळी दरड कोसळली. सद्य स्थितीत दक्खन ते कळकदारा हा एकेरी मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. मात्र ही भली मोठी दरड सद्या वाहतूक सुरु असलेल्या महामार्गाच्या अत्यंत जवळ आली आहे. चार पदरीच्या मधोमध लोखंडी कंपाउंड असल्यामुळे दरड वाहतुकीच्या मार्गांवर आली नाही. मात्र काही दगडीचे तुकडे आले असून वाहतुकीला धोका निर्माण होऊ शकतो. पाऊसाचे वाढते प्रमाण लक्षात घेता वाहन धारकांनी वाहने सावधतेने चालवावीत असे आवाहन करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.