मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी धावून जाणारा सय्यद आदिल हुसैन शाह या अवघ्या २० वर्षीय स्थानिक युवकाचा देखील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. माणुसकी दाखवत धाडसाने दहशतवाद्यांना सामोरे जाणाऱ्या सय्यदच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत केली.
पहलगाम येथे मदतीसाठी गेलेले शिवसेना कार्यकर्ते आणि सरहद संस्थेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज सय्यदच्या कुटुंबीयांना धनादेश देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. अवघ्या २० वर्षीय असलेला सय्यद आदिल पहलगाममध्ये पर्यटकांना घोड्यावरुन फिरवण्याचं काम करायचा. त्याच्या घोड्यावरुन जो प्रवासी पहलागमची सफर करत होता त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. दहशतवादी समोर आल्यानंतर सय्यद याने धाडस दाखवत एका दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी त्याला गोळी मारल्याने त्याचा मृत्यू झाला.
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरममध्ये फिरायला गेलेले राज्यातील अनेक पर्यटक तिथेच अडकून पडले होते. त्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी २३ एप्रिल रोजी रात्री उशीरा श्रीनगर येथे पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली. त्यांची विचारपूस करून त्यांना दिलासा दिला. या हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांनी सय्यद आदिलने दाखवलेली माणुसकी आणि धाडसाबाबतचा अनुभव उपमुख्यमंत्र्यांना सांगितले.
सय्यद आदिलच्या कुटुंबीयांची शिवसेना कार्यकर्ते आणि सरहदचे पदाधिकारी यांनी भेट घेत मदतीचा धनादेश त्यांच्याकडे दिला. यावेळी स्थानिक आमदार सईद रफीक शाह उपस्थित होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सय्यदच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. सय्यद आदिलच्या भावाने हल्ल्याच्या दिवशी झालेला घटनाक्रम सांगितला.
सय्यद आदिलने बहादुरी दाखवत माणुसकीचे अनोखे उदाहरण जगासमोर दाखवून दिले आहे, त्याचे हौतात्म्य वाया जाणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शाह कुटुंबियांचे सांत्वन केलं. तसेच सय्यद आदिलच्या कुटुंबाचे मोडकळीस आलेले घर नव्याने बांधून देण्यासाठी मदत करू, अशी ग्वाहीही शिंदे यांनी यावेळी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.