संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरातील एका जमिनीच्या सातबाऱ्यावर अवघ्या एका तासात दुसऱ्या व्यक्तीचे नाव नोंदविल्याचा आरोप करण्यात आल्याने कल्याण तहसील कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी भाजपा पदाधिकारी आणि विकासक प्रेमनाथ म्हात्रे यांनी केली आहे.
गौरीपाडा परिसरातील एका शेतकऱ्याच्या जमिनीबाबत ६ ऑगस्ट रोजी फेरफार करण्यात आल्याचे म्हात्रे यांचे म्हणणे आहे. या फेरफार प्रक्रियेत शेतकऱ्यासोबत त्याच्या एका महिला नातेवाईकाचे नावही नोंदविण्यात आले आणि त्यानंतर सातबाऱ्यावर तिचे नाव समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या एका तासात झाल्याचा दावा करण्यात येत आहे. सामान्यतः फेरफार प्रक्रियेत संबंधितांना नोटीस देणे आणि हरकतींसाठी वेळ देणे अपेक्षित असते. मात्र, या प्रकरणात कोणतीही पूर्वसूचना न देता इतक्या वेगाने प्रक्रिया कशी पूर्ण झाली, असा सवाल प्रेमनाथ म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.
या संदर्भात कल्याणचे तहसीलदार विकास गारुडकर यांच्याकडे विचारणा केली असता, आपल्यावर राजकीय दबाव असल्याचे सांगण्यात आल्याचा दावा म्हात्रे यांनी केला. तहसीलदारांच्या भूमिकेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. आमची सत्ता असताना माझ्यासोबतच असा प्रकार होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा सवाल म्हात्रे यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
जमीन व्यवहारांमध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे विकासक आणि शेतकऱ्यांना ब्लॅकमेल करणारी टोळी सक्रिय असल्याचा आरोपही म्हात्रे यांनी केला आहे. या आरोपांमुळे प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. कल्याणचे तहसीलदार विकास गारुडकर यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती आपल्याला सध्या नसल्याचे सांगितले. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि त्यानंतर पुढील माहिती दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आता या फेरफाराची प्रक्रिया नेमकी कोणत्या नियमांनुसार करण्यात आली, संबंधितांना नोटीस देण्यात आली होती का आणि अवघ्या एका तासात सातबाऱ्यावर नाव नोंदविण्याची प्रक्रिया कशी पूर्ण झाली, याबाबतच्या चौकशीतून नेमके काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.