कोस्टल रोडवर दररोज ५०० ई-चालानद्वारे वेगवान वाहनांवर कारवाई
एएनपीआर कॅमेऱ्यांच्या मदतीने वाहनचालकांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे.
वारंवार उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अपघात टाळण्यासाठी वाहतूक विभागाची कडक कारवाई सुरू आहे.
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून तसेच उपनगर, महामुंबई कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने अटल सेतू आणि कोस्टल रोड यासारखे विस्तीर्ण रस्ते तयार करण्यात आले आहेत. यामुळे प्रवास जलद झाला असला, तरी वाहनांच्या सुसाट वेगामुळे हे रस्ते जणू रेसिंग ट्रॅकच बनले आहेत. गेल्या काही दिवसांत कोस्टल रोडवर भरधाव वाहनांमुळे अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अशाच एका अपघातात एका तरुणीसह ऑन ड्युटी असलेल्या पोलिसाचा बळी गेला. या स्पीडवर आता वाहतूक पोलिसांची करडी नजर राहणार आहे. तसेच वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाला मोठ्या कारवाईचा दणका बसणार आहे.
सतत घडणाऱ्या या अपघाताचं खरं कारण म्हणजे कोस्टल रोडच्या बोगद्यात काही वाहनांनी थेट १४० चा वेग गाठल्याचे कारवाईतून उघडकीस आले. वाहनांच्या सुसाट वेगाला वाहतूक विभागाने ठोस पावलं उचलत ब्रेक लावला आहे. त्यासाठी दिवसाला ५०० ई-चालानद्वारे कारवाई सुरू आहे. याव्यतिरिक्त वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय हाती घेण्यात आला आहे.
सप्टेंबर महिन्यात वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत, भरधाव वेगासाठी ११ हजार १७३, तर बससाठीची राखीव लेन वापरल्यामुळे चार हजार ४२३ ई-चालानद्वारे कारवाई करण्यात आली आहे. नियमांचे हे उल्लंघन ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन (एएनपीआर) कॅमेऱ्यांद्वारे टिपण्यात येत आहे. ‘एएनपीआर’ कॅमेरे जुलैअखेरीस कार्यान्वित झाले, तर ई-चालानप्रणाली ४ सप्टेंबरला बोगद्यांसाठी आणि २७ सप्टेंबरला संपूर्ण कोस्टल रोडवर सुरू झाली आहे. त्यानुसार, ई-चालानद्वारे कारवाईचा वेग वाढला आहे.
वाहतूक विभागाचे अनिल कुंभारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोस्टल रोड हा जरी उच्चगती मार्ग असला, तरी दिलेल्या वेगाचे पालन करणे आवश्यक आहे. आमची संपूर्ण टीम कॅमेऱ्यांद्वारे वेगमर्यादा आणि बस लेन उल्लंघन, यावर बारकाईने लक्ष ठेवत आहे. शिस्त राखण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. वारंवार उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध थेट गुन्हा दाखल केला जाईल, तसेच वाहन जप्त करण्याचीही कारवाई केली जाऊ शकते. असे त्यांनी म्हटले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.