संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी,
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारात मिठाई, चिवडा आणि फरसाण यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, या खाद्यपदार्थांमध्ये भेसळ तसेच निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाचा सर्रास वापर केला जात असल्याचे अनेकदा समोर येते. अशातच, दिवाळीपूर्वीच अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात मोठी कारवाई केली आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल 18 कोटी रुपयांचा खाद्यतेलसाठा जप्त करण्यात आला आहे.
भेसळयुक्त आणि असुरक्षित खाद्यतेलाची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यात विशेष मोहीम राबवली आहे. १ एप्रिल ते २९ ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल १८ कोटी ९४ लाख ७६ हजार रुपये किंमतीचा २८ हजार ७५३ क्विंटल खाद्यतेलसाठा जप्त करण्यात आला आहे. या मोहिमेत राज्यभरातील ८० अन्न व्यवसायांचे परवाने निलंबित करण्यात आले असून १,०८९ तपासण्या करून खाद्यतेलाचे १,६६० नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
नागरिकांना भेसळमुक्त आणि सुरक्षित खाद्यतेल उपलब्ध व्हावे, यासाठी खाद्यतेल उत्पादक, पुर्नपॅकिंग करणारे, पुनर्लेबलिंग करणारे, घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत या अहवालांमध्ये ४६२ नमुने प्रमाणित आढळले आहेत. तर ४० नमुने अप्रमाणित, १८ नमुने असुरक्षित आणि पाच नमुने मिथ्याछाप असल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप १,१७१ नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. दोषी आढळलेल्या व्यावसायिकांविरोधात कारवाई सुरू आहे.
परवाना निलंबनात छत्रपती संभाजीनगर आणि पुणे आघाडीवर
राज्यात सर्वाधिक २७ परवाने छत्रपती संभाजीनगर विभागात निलंबित करण्यात आले आहेत. त्यासोबतच पुणे विभागात २२, बृहन्मुंबईत आठ, कोकण विभागात सहा, नाशिकमध्ये सहा, नागपूरमध्ये सहा आणि अमरावती विभागात पाच परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
तेलसाठा जप्तीमध्ये पुणे विभाग आघाडीवर असून येथे १९ हजार ५५२ क्विंटल तेल जप्त करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर विभागात ५ हजार ७३६ क्विंटल, कोकण विभागात २ हजार १४६ क्विंटल, बृहन्मुंबईत ५०६ क्विंटल, नाशिकमध्ये ३८८ क्विंटल, नागपूरमध्ये २५५ क्विंटल आणि अमरावतीमध्ये १६७ क्विंटल तेलसाठा जप्त करण्यात आला आहे.
मुंबईतील आठ आस्थापनांवर कारवाई
बृहन्मुंबई विभागात कुर्ला येथील मे. अंकट ऑइल्स, भायखळा ऑइल डेपो, नागपाडा येथील राज ऑइल ट्रेडिंग, गोरेगाव पूर्व येथील आशापुरा ट्रेडर्स, घाटकोपर पूर्व येथील दीपा वुड प्रेस्ड ऑइल, मालाड पूर्व येथील मोमाई ऑइल अँड ग्रेन डेपो आणि कांदिवली पश्चिम येथील अजंता ऑइल ट्रेडिंगच्या दोन परवान्यांचा समावेश आहे. या आठ परवान्यांचे ऑक्टोबर महिन्यात निलंबन करण्यात आले आहे.
खाद्यतेलाची विक्री पुनर्वापर केलेल्या डब्यांमधून किंवा विनालेबल कंटेनरमधून करणे, तेलाच्या गुणवत्तेबाबत संशय, उत्पादनस्थळी प्रयोगशाळा किंवा तांत्रिक व्यक्ती नसणे, अस्वच्छ वातावरणात उत्पादन आणि लेबलविषयक नियमांचे उल्लंघन ही कारवाईची प्रमुख कारणे आहेत. परवाना निलंबित असताना संबंधित आस्थापनांना व्यवसाय करता येणार नाही. तसेच जप्त केलेल्या तेलाची विक्री, वाहतूक, हस्तांतरण किंवा पुनर्पॅकिंग करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खाद्यतेल व्यावसायिकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी परवानाधारक विक्रेत्यांकडून मूळ सीलबंद पॅकमधील तेल खरेदी करावे. तेलाच्या पॅकेटवरील FSSAI क्रमांक, उत्पादन दिनांक, बॅच क्रमांक आणि एक्सपायरी तपासावी. खाद्यतेलातील भेसळ किंवा अनधिकृत विक्रीबाबत संशय असल्यास १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.