Mumbai Crime: 
मुंबई/पुणे

ED चे अधिकारीच निघाले चोर! मुंबईतील व्यावसायिकाकडून उकळले २.२५ कोटी; थेट गुन्हा दाखल

मुंबईतील व्यावसायिकाकडून कारवाईची भीती दाखवून २.२५ कोटी रुपये उकळल्याचा EDच्या दोन अधिकाऱ्यांवर आरोप आहे. प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

मुंबईतील एका व्यावसायिकाला कारवाईची भीती दाखवून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) दोन अधिकाऱ्यांनी तब्बल २.२५ कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ED च्या जयपूर येथील दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गोरेगाव येथील बांगूर नगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता याचा तपास आता मुंबई गुन्हे शाखेकडे (Crime Branch) सोपवण्यात आला आहे.

अटकेची भीती दाखवून ५ कोटींची मागणी

मुंबईतील 'विंट्री टेक' कंपनीचे मालक अमूल्य वस्सा यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २० जुलै रोजी जयपूर ED चे सहाय्यक संचालक मोहित गर्ग आणि अंमलबजावणी अधिकारी देवेंद्र गुप्ता हे त्यांच्या मालाड येथील कार्यालयात आले. त्यांनी कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांशिवाय वस्सा यांच्यावर गंभीर आरोप केले आणि कार्यालय सील करून अटकेची भीती दाखवली.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही अधिकाऱ्यांनी सुरुवातीला अमूल्य वस्सा यांच्याकडे ५ कोटी रुपयांची लाच मागितली होती. पैसे न दिल्यास कठोर कारवाई करण्याची धमकी त्यांनी दिली. अखेर दोन्ही बाजूंमध्ये २.२५ कोटी रुपयांवर तडजोड झाली. त्याच संध्याकाळी वस्सा आणि त्यांचा भागीदार आरोपी अधिकाऱ्यांसोबत मालाडमधील एका रेस्टॉरंटमध्ये भेटले. तिथे झालेल्या चर्चेनंतर दुसऱ्याच दिवशी वस्सा यांनी १ कोटी रुपये आरोपींकडे सुपूर्द केले.

दिल्लीतील मॉलमध्ये बनावट कागदपत्रे अन् उरलेली रक्कम

पहिला हप्ता मिळाल्यानंतर आरोपींनी "वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण बंद केले आहे" असा दावा केला. वस्सा यांनी कागदोपत्री पुराव्याची मागणी केली असता, फाईलची सत्यता फक्त दिल्लीतच तपासता येईल असे सांगण्यात आले. त्यानुसार २५ जुलै रोजी वस्सा यांच्या दोन सहकाऱ्यांनी दिल्लीतील एका मॉलमध्ये आरोपींची भेट घेतली. तिथे आरोपींनी प्रकरण मिटवल्याचे एक बनावट दस्तऐवज दाखवले आणि उर्वरित १.२५ कोटी रुपये उकळले.

हप्तेबाजीमुळे फुटला भांडाफोड

एवढी मोठी रक्कम मिळूनही आरोपींचे समाधान झाले नाही. "वरिष्ठ अधिकारी नाराज असून त्यांना आणखी पैसे द्यावे लागतील," असे सांगून त्यांनी अतिरिक्त रक्कमेसह दरमहा नियमित हप्त्याची (मंथली) मागणी सुरू केली.

सततच्या मागणीमुळे संशय आल्याने वस्सा यांनी कागदपत्रांची पडताळणी केली आणि ओळखीच्या सूत्रांकडून चौकशी केली. तेव्हा आपली फसवणूक झाली असून ED अधिकाऱ्यांनीच आपल्याकडून २.२५ कोटी रुपये उकळल्याचे स्पष्ट झाले.

ED ने स्वतः पुढाकार घेऊन दाखल केला FIR

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली असता तक्रारीत नमूद केलेले मोहित गर्ग आणि देवेंद्र गुप्ता हे दोघेही खरोखरच ED चे अधिकारी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ED ने स्वतः पुढाकार घेत या प्रकरणी FIR दाखल केला आहे.

दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा आणि ED च्या अधिकारांचा गैरवापर करून कट रचला, व्यावसायिकाला धमकावले आणि २.२५ कोटी रुपयांची खंडणी उकळली असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखा आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : उजव्या की डाव्या? बीपी नेमकं कोणत्या हातात तपासावं, अचूक रीडिंगसाठी आताच जाणून घ्या

Maharashtra News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपुरात ७६ फुटांचा केक

High Cholesterol: नसांमध्ये साचलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? दररोज प्या ही 5 ड्रिंक्स, ट्रायग्लिसराइड्सही कमी होईल

Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेत ५,००० कोटींचा घोटाळा? पुरुषांच्या खात्यातही पैसे; सुप्रिया सुळेंच्या पोस्टने खळबळ

Repo Rate : होम अन् कार लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI च्या इशाऱ्याने चिंता वाढली, वाचा लेटेस्ट अपडेट

SCROLL FOR NEXT