पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. दिवाळीमध्ये सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुणे महानगर पालिकेने यासंदर्भात नियमावली जारी केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. पुण्यात होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषण लक्षात घेता पुणे महानगर पालिकेने हा निर्णय घेत नियम जारी केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ध्वनी आणि वायू प्रदूषणाबाबत पुणे महापालिकेने नागरिकांना आवाहन केलं. सार्वजनिक रस्ते, गल्ली, चौक, उद्याने, फुटपाथवर फटाके फोडण्यास मनाई केली आहे. रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये व इतर अधिसूचित शांतता क्षेत्रांच्या परिसरात फटाके फोडू नयेत, महापालिकेने पुणेकरांना आवाहन केले आहे. फटाके आणि ध्वनिवर्धक यंत्रणांमुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने सण आणि उत्सव साजरे करावेत, फटाक्यांचा वापर टाळावा अशी साद पुणे महापालिकेने पुणेकरांना घातली आहे.
मुंबई हायकोर्टाने स्वतःहून यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने दिलेले आदेश तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्ये अधिसूचनेनुसार आवाज निर्माण करणाऱ्या साधनांमुळे ध्वनी प्रदूषण करण्याच्या घटकांबाबत निश्चिती केली असून त्यावर नियंत्रण आणणे पालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. यानुसारच पुणे महानगर पालिकेने सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घातली.
पुणे महानगर पालिकेने नागरिकांना आवाहन केले की, आपण वातावरणातील बदल अनुभवत आहोत. वातावरणातील बदलांच्या अनेक कारणांपैकी ध्वनी प्रदूषण हे एक महत्त्वाचे कारण आहे. विविध सण उत्सव प्रसंगी आपण वाजवत असलेल्या फटाक्यांमधून कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण अधिक असते. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका असतो. यासाठी पुणे महानगरपालिका नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नये आणि नियमांचे पालन करण्यास सांगितले.