हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग आजपासून पुणेकरांच्या सेवेत
पुणे मेट्रो ३ मार्गिकेचे ३ नोव्हेंबरला पीएम मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले
या मेट्रोने प्रवासासाठी किती पैसे द्यावे लागणार याची माहिती समोर आली
पुण्याला आणखी एक नवा मेट्रो मार्ग मिळाला. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो आजपासून सेवेत आली. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास सुसाट, गर्दीमुक्त आणि गारेगार होणार आहे. या मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ३ नोव्हेंबरला उद्घाटन करण्यात आले. आजपासून पुणेकरांना या मेट्रोने प्रवास करता येणार आहे. या मेट्रोमुळे पुणे शहराच्या विकसाला नवी गती मिळाली आहे. ही मेट्रो कुठून ते कुठपर्यंत धावणार आहे, स्थानकं किती असणार आहेत आणि तिकीटाचे दर किती असतील हे आपण जाणून घेणार आहोत...
हिंजवडी आणि आसपासचा परिसर हा देशातील महत्त्वाचा आयटी हब आहे. या परिसरात दररोज हजारो कर्मचारी कामासाठी येतात. या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे बऱ्याचदा प्रवाशांना १ ते २ तास एकाच ठिकाणी अडकून राहवे लागते. वाहतूक कोंडीमुळे परिसरात काम करणारे कर्मचारी वैतागले होते. पण आता मेट्रो सुरू झाल्यामुळे आयटी क्षेत्रातील कर्मचारी, विशेषतः तरुण- तरुणींना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे मेट्रो-३ हा देशातील सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारण्यात आलेला पहिला मेट्रो प्रकल्प आहे. राष्ट्रीय मेट्रो रेल धोरण २०१७ अंतर्गत डीबीएफओटी पद्धतीने या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. सुमारे ८ हजार ३१३ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाच्या उभारणीमध्ये महिलांचा मोठा सहभाग असून मेट्रो संचालनातही महिला महत्त्वाची जबाबदारी सांभाळणार आहेत. विशेष म्हणजे, ही मार्गिका देशातील पहिली १०० टक्के महिला संचालित मेट्रो ठरणार असून सुमारे १०० महिला ट्रेन पायलट आणि स्थानकांवरील ५० टक्के महिला कर्मचारी या मार्गिकेचे संचालन करणार आहेत.
हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ किलोमीटरच्या मेट्रो मार्गामुळे पुणे मेट्रोचे जाळे ५५ किलोमीटरपर्यंत विस्तारले आहे. आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि लाखो नागरिकांना या मेट्रोचा फायदा होणार आहे. सप्टेंबर महिन्यात पुणेकरांनी मेट्रोतून ९ लाख ५८ हजार ६०३ प्रवास केले असून मेट्रो ही आता पुणेकरांची जीवनवाहिनी बनली आहे. खडकवासला–खराडी, वनाज–चांदणी चौक, रामवाडी–वाघोली आणि मानिकबाग–नळस्टॉप या सुमारे ४६ किलोमीटरच्या नव्या मार्गांचे भूमिपूजनही होत आहे. यामुळे पुण्याच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भागांची जोडणी अधिक सक्षम होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
० ते २ किमी - १२ रुपये
२ ते ४ किमी - २५ रुपये
४ ते ८ किमी - ३७ रुपये
८ ते १२ किमी - ४३ रुपये
१२ ते १८ किमी - ४९ रुपये
१८ ते २३ किमी - ६२ रुपये
संपूर्ण मार्गाचे अंतर : २३ किलोमीटर
एकूण स्थानके : २३ स्थानके
पहिल्या टप्प्यात सुरू होणारी स्थानके : १७ स्थानके
पहिली मेट्रो : सकाळी ६ वाजता
गर्दीच्या वेळेत : दर ६ मिनिटांनी मेट्रो
कमाल तिकीट : ६२ रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.