स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
ऊसाला प्रतिटन 4,500 रुपये पहिली उचल मिळावी प्रमुख मागणी
22 तासांपासून आंदोलन सुरु
महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
दुष्काळ आणि आर्थिक अडचणींमुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा संताप आता रस्त्यावर दिसू लागला आहे. ऊसाला योग्य भाव मिळावा, या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऐन दिवाळीत आंदोलन सुरू केले आहे. सातारा जिल्ह्यातील नागठाणे गावाजवळ पुणे-बेंगळुर राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
ऊसाला पहिली उचल म्हणून प्रतिटन 4,500 रुपये मिळावेत, अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. याच मागणीसाठी शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या मांडला आहे. गेल्या 22 तासांपासून हे आंदोलन सुरू असल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून वाहनांना पर्यायी मार्गाने पाठवले जात आहे.
या आंदोलनाचा फटका केवळ प्रवासी वाहनांनाच नाही, तर मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांनाही बसत आहे. आंदोलनामुळे मालवाहतूक करणारे ट्रक अडकून पडले आहेत. मात्र, इतर वाहनांना पर्यायी मार्गाने सोडले जात असल्याने ट्रकचालकांमध्ये नाराजी वाढली आहे. 'आम्हाला पुढे जाऊ दिले जात नसेल, तर इतर वाहनांनाही जाऊ देणार नाही,' अशी भूमिका घेत काही ट्रकचालक आक्रमक झाले. त्यांनीही महामार्गावरील वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
एकीकडे ऊसाला योग्य दर मिळावा यासाठी शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत, तर दुसरीकडे महामार्ग बंद असल्यामुळे प्रवासी आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः दिवाळीच्या काळात प्रवास करणाऱ्या नागरिकांना या वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या 4,500 रुपये प्रतिटन पहिल्या उचलच्या मागणीवर सरकार आणि साखर कारखानदार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रश्नावर लवकर तोडगा निघणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.