Devendra Fadnavis On Kasba Peth Election Result : गेल्या महिन्याभरापासून राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीची आज मतमोजणी पार पडली. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा तब्बल ११ हजार मताधिक्याने पराभव केला आहे. भाजपला बसलेला हा सर्वात मोठा धक्का आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, या पराभवानंतर भाजप नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. कसब्यात झालेल्या पराभवाचं आम्ही आत्मचिंतन करू, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भाजपचा उमेदवार का पराभूत झाला? त्यामागे नेमकी कारणे कोणती? यावर आत्मचिंतन केलं जाणार अशी ग्वाही सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर कसब्याबद्दल आम्ही नक्कीच आत्मचिंतन करू, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी सुद्धा पराभवानंतर आपली प्रतिक्रिया दिली. उमेदवार म्हणून मी कमी पडलो. यामागची कारणे शोधणार आहे. पक्षाने मला संधी दिली, पण मीच कुठेतरी कमी पडलो. हा पराभव मला मान्य आहे, असे रासने यांनी सांगितले. (Maharashtra Political News)
कसब्यामध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर तिथे पोटनिवडणुका लागल्या. या निवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली जात होती. खुद्द टिळक कुटुंबातूनही तशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.
मात्र, त्याऐवजी भाजपाकडून माजी आमदार हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यामुळे कसब्यात भाजपाविरोधी नाराजी असल्याचं सांगितलं जात होतं. अखेर आज मतमोजणीनंतर ही नाराजी निकालाच्या रुपाने दिसून आल्याचं सांगितलं जात आहे.
विजयानंतर रवींद्र धंगेकर काय म्हणाले?
मी मतदारसंघातील जनतेचे आभार मानतो. त्यांनी माझ्या पारड्यात मतरूपी आशिर्वाद टाकले. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी विजयी झालो. त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, असं धंगेकर म्हणालेत. शिवाय महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचेही त्यांनी आभार मानलेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि अर्थातच काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीचं काम केलं. त्यामुळे हा विजयाचा दिवस पाहता आला. त्यांचे मनापासून आभार. या विजयाचं श्रेय जनता आणि महाविकास आघाडीचं आहे, असंही धंगेकर म्हणाले.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.