संजय गडदे, मुंबई
Mumbai News: मुंबईच्या कांदिवली (Kandivali) येथील डहाणूकरवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डहाणूकर वाडी परिसरातील रस्त्यावरील मेनहॉल सफाई करण्यासाठी उतरलेल्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मॅनहोल (Manhole) साफ करत असताना या कर्मचाऱ्याच्या अंगावरुन कार गेली. गंभीर जखमी झालेल्या या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओ (CCTV Video) समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जगवीर यादव (37 वर्षे) असं मृत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे. सफाई कर्मचारी जगवीर यादव हे 13 जून रोजी कांदिवलीच्या डहाणूकरवाडी परिसरात ड्रेनेज लाईन साफ करण्यासाठी मॅनहोलमध्ये उतरले होते. मॅनहोलमधून ते घाण बाहेर काढत होते. त्याचवेळी त्यांच्या अंगावरुन कार गेली. या अपघातामध्ये जगवीर यादव हे गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना मॅनहोलमधून बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी कारचालक विनोद उधवानी आणि कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली त्यावेळी कारचालक विनोद उधवानी यांच्यासह कंत्राटदारावरही निष्काळजीपणा केल्याप्रकरणी कलम 196 सह कलम 279, 336 आणि 338 अंतर्गत कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण आता सफाई कामगाराच्या मृत्यूनंतर पोलिसांनी या प्रकरणात या दोघांविरोधात कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी पोलिसांनी आता कारचालक विनोद उधवानीला अटक केली. त्याचसोबत ड्रेनेज साफसफाई करताना सुरक्षेच्या योग्य उपाययोजना न केल्याप्रकरणी कंत्राटदार अजय शुक्लालाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गोवंडीमध्ये देखील मॅनहोल सफाई करण्यासाठी उतरलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. शिवाजीनगर येथील रस्ता क्रमांक 10 वर नव्याने पालिकेच्या कंत्राटदाराकडून मलनिस्सारणाचे काम करण्यात येत आहे. हेच काम करत असताना सुधीर महेंद्र दास आणि रामकृष्ण निरंजन दास या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.