काशिनाथ चौधरी यांच्या भाजप प्रवेशाला २४ तासांतच स्थगिती देण्यात आली.
पालघर साधू हत्याकांडाशी संबंधित आरोपांमुळे वाद निर्माण झाला होता.
राज्यभरातून टीका झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्षांनी हा निर्णय घेतला.
चौधरी यांच्या नावाचा कोणत्याही FIR किंवा चार्जशीटमध्ये उल्लेख नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
Palghar Accused BJP Entry News : काशिनाथ चौधरी यांच्या भाजप पक्षप्रवेशाला प्रदेश कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना पत्र पाठवत काशिनाथ चौधरी यांचा पक्षप्रवेश तातडीने रोखण्याचे आदेश दिले. गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात भाजपने मागील काळात काशिनाथ चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याच चौधरी यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राज्यभरातून टीकेची झोड उडाली होती. त्याशिवाय विरोधकांनीही यावर रान उठवले होते.
पालघर साधू हत्याकांड प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन, स्थानिक पातळीवर झालेल्या काशिनाथ चौधरी यांच्या प्रवेशाच्या निर्णयाला प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी तात्काळ स्थगिती दिल्याची माहिती प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिली आहे. तपासातील अधिकृत नोंदींनुसार कोणत्याही FIR किंवा चार्जशीटमध्ये त्यांचं नाव नाही, तरीही विषयाचा गांभीर्याने विचार करून काशिनाथ चौधरी यांच्या पक्ष प्रवेशाला प्रदेश पातळीवरून तात्काळ स्थगिती देण्यात येत आहे, असेही बन म्हणाले.
काशिनाथ चौधरी हे पालघर जिल्ह्यातील एक राजकीय नेते आहेत. ज्यांचा उल्लेख प्रसिद्ध पालघर साधू हत्याकांडाशी संबंधित केला जातो. या घटनेनंतर भाजपने त्यांच्यावर मुख्य सूत्रधार म्हणून गंभीर आरोप केले होते, मात्र सध्या त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने वाद निर्माण झाला होता. चौधरी हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष (शरद पवार गट)चे स्थानिक नेते होते, पण १६ नोव्हेंबर २०२५ रोजी एक मोठ्या जाहीर पक्षप्रवेशाद्वारे त्यांनी आणि त्यांच्या शेकडो समर्थकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.
काशिनाथ चौधरी यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेसपासून सुरू झाला होता. पालघर साधू हत्याकांडात त्यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केले होते, परंतु स्थानिक नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरच भाजपने त्यांना पक्षात सामील करून घेतल्याने टीकेचा सामना करावा लागला. चौधरी यांच्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याला भाजपचे प्रमुख नेते आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. पण आता त्यांच्या पक्ष प्रवेश रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पालघर साधू हत्याकांड आणि चौधरी यांचा संबंध
१६ एप्रिल २०२० रोजी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात दोन साधू आणि त्यांच्या चालकाची जमावाने हत्या केली होती. या घटनेत २०० जणांना अटक झाली होती आणि चौधरी यांच्यावर या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप भाजपने केला होता.
या हत्याकांडाने राज्यभरात जोरदार राजकीय वादंग निर्माण झाले होते. विरोधकांच्या मते, ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच भाजपने पक्षात घेतल्यामुळे भाजपवर "दुटप्पीपणा" असल्याची टीका होत आहे. काशिनाथ चौधरी हे पालघर जिल्ह्यातील बांधकाम व वित्त समितीचे माजी सभापती आणि स्थानिक नेता म्हणून ओळखले जातात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.