बदलापूर : नामांकित शाळेतील चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराविरोधात बदलापूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ शेकडो नागरिक शाळेबाहेर जमले आहेत. या शाळा प्रशासनाच्या विरोधात नागरिकांकडून निषेधाच्या घोषणा दिल्या जात आहेत. या व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, ज्वेलर्स असोसिएशन, स्कूल बस असोसिएशनचा बंदला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला आहे.
बदलापुरातील ज्या शाळेत ही घटना घडली आहे, त्या शाळेबाहेर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली आहे. नागरिकांकडून शाळेच्या विरोधात जोरदार आंदोलन केले जात आहे. याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापकाचे निलंबन करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल होण्यासाठी कुटुंबीयांना १२ तास वाट पाहावी लागली होती.
शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी किरण बेलवडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शाळेतील एका कर्मचाऱ्याने हे कृत्य केल्याची माहिती मिळाली आहे. बदलापूरमधील नामांकित शाळेत घडलेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, ज्वेलर्स असोसिएशन, स्कूल बस असोसिएशनने या बंद पाठिंबा दिल्याने शहरातील बहुतेक दुकाने बंद आहेत. तर रस्त्यावर रिक्षाही फार कमी धावताना दिसत आहेत.
बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत मोठ्या शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या चार वर्षांच्या दोन मुली शाळेत लघुशंकेसाठी जात होत्या. त्यावेळी शाळेतीलच एका सफाई कर्मचाऱ्याने या दोघींवर अत्याचार केला. ही घटना १२ आणि १३ ऑगस्ट रोजी घडली. या पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत नव्हत्या. त्यामुळे तिच्या आजोबांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीत तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं. याचप्रमाणे आणखी एका मुलीसोबतही सारखाच प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली.
या दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री एक वाजेपर्यंत पोलिसांकडून एफआयआर नोंदवून घेण्यात आला नव्हता. अखेर मनसेने या प्रकरणात हस्तक्षेप करत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधला. त्यानंतर एफआयआर नोंदवून घेण्यात आला. त्यामुळे पोलिसांच्याही कारभारावर संताप व्यक्त होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.