योगेश काशिद, बीड प्रतिनिधी
Dhananjay Munde Latest Marathi News Update : नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांदरम्यान महाराष्ट्रातील मोठमोठे नेते मला बदनाम करण्यासाठी सरसावले होते, असा खळबळजनक दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा संशयकल्लोळ सुरू झाला आहे. ते म्हणाले की, ज्यावेळी नगरपालिकांच्या निवडणुका होत्या, त्यावेळी महाराष्ट्रभर निवडणुकीचे वातावरण होते. मी मात्र वेगळ्याच मनःस्थितीत होतो. सर्वजण केवळ एकट्या धनंजय मुंडे यांना बदनाम कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करत होते. शेवटी मला वाटले, आपल्यामध्ये नक्कीच काहीतरी विशेष आहे, म्हणूनच हे सर्वजण मला संपवायला निघाले आहेत.
सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि युट्युब चॅनल्सद्वारे विरोधात वातावरण निर्मिती केली जात असतानाही, परळीच्या मायबाप जनतेने महायुतीला भक्कम पाठिंबा दिला आणि ऐतिहासिक विजय मिळवून दिला, असे म्हणत मुंडेंनी परळीतील जनतेचे आभार मानले.
बीड जिल्ह्यातील परळी येथे आयोजित 'प्रधानमंत्री आवास घरकुल योजना' धनादेश वाटप कार्यक्रमात आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते चेक वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना धनंजय मुंडे म्हणाले की, परळीतील नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आतापर्यंत तीन हजार घरकुलांचे वाटप केले आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांच्या घरांवरील पत्रे जाऊन आता पक्के छत येणार आहे. "यावर्षी ६७७ घरकुलांचे वाटप हे शेवटचे नसून, एकूण १५०० घरकुलांचे वाटप होणार आहे," असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. परळी शहरातील एकही पात्र लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची काळजी नगरसेवकांनी घ्यावी, असे ते म्हणाले.
जर माझ्याकडे तक्रार आली तर त्यांची खैर नाही, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी नगरसेवकांची कानउघाडणी केली. ते म्हणाले, "मागचे सर्व सोडून आता तुम्हाला प्रत्येक नागरिकाची कामे करावी लागणार आहेत. ज्यांनी मला मतदान केले त्यांचीच कामे करणार आणि बाकीच्यांची नाही, असा भेदभाव करू नका. ही सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे, ती गमावू नका," असा टोला त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना लगावला.
ते पुढे म्हणाले की, निवडणुका होऊन जवळपास दोन ते तीन महिने झाले आहेत, मात्र आज नगरसेवक फारसे खुश दिसत नाहीत. तुम्ही निवडून येणे आणि नगरपालिकेचे बजेट संपणे एकाच वेळी झाले आहे, मात्र ही परिस्थिती लवकरच बदलणार आहे. जे नगरसेवक निवडून आले आहेत, त्यांना जर वाटत असेल की ते स्वतःच्या जिवावर निवडून आले आहेत, तर तो त्यांचा गैरसमज आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी मी काय प्रयत्न केले आहेत, हे त्यांना अद्याप ठाऊक नाही. तसेच, जे या निवडणुकीत पराभूत झाले आहेत, त्यांनाही माहित आहे की मी त्यांना मागील वेळी कसे निवडून आणले होते.
"मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या प्रभू वैद्यनाथाला (ज्याला दक्षिणेची काशी म्हणून ओळखले जाते) तीर्थक्षेत्र विकासासाठी ३०० कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर केला आहे. 'प्रसाद' योजनेच्या माध्यमातून केंद्रापर्यंत आपली ओळख नक्कीच पोहोचेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या परळीतील सोलर प्रकल्पासाठी सरकार १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.