नंदुरबार: राज्यात राजकीय नेत्यांवर ईडीची कारवाई होत असतानाच आता सामाजीक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar ED Notice) यांनाही आज ईडीची नोटीस आली आहे. विशेष म्हणजे १७ वर्षापुर्वीच्या प्रकरणातून त्यांना ही नोटीस पाठल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जेष्ठ पर्यावरणवादी नेत्या मेधा पाटकर यांच्या नर्मदा नवनिर्माण अभियान या एनजीओच्या खात्यावर काही संशयित व्यवहार झाल्याच्या आरोपात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ईडी कारवाईबाबत संजीव झा यांच्या तक्रारीचे आमच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत, संबंधित विभागाला ती सादर करत आहोत असं मेधाताई पाटकर म्हणाल्या आहेत. (We have the documents of Sanjeev Jha's complaint; Let's present all the evidence Said Medha Patkar)
हे देखील पहा -
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 36 वर्षांपासून नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून आदिवासी भागात सामाजिक कार्य करणाऱ्या मेधाताई पाटकर यांच्यावर गाजियाबाद भाजपचे जिल्हा सचिव संजीव झा यांच्या तक्रारीवरून ईडी - अर्थात अंमलबजावणी संचालनालय, डी आर आय, आयटी विभाग यांनी राजकीय नेत्यांपाठोपाठ आता नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पात बुडित क्षेत्रातील तमाम आदिवासींना न्याय हक्क मिळवून देणाऱ्या मेधाताई पाटकर या मुख्य विश्वस्त असलेल्या नर्मदा नवनिर्माण अभियान एनजीओ वरील कारवाईने कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली असून नाराजी व्यक्त केली जात आहे. २००५ साली म्हणजेच तब्बल १७ वर्षांपूर्वीचे हे प्रकरण असून ईडीबरोबर महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) आणि आयकर विभागातही (Income Tax) पाटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडी कारवाई संजीव झा यांच्या तक्रारीचे आमच्याकडे सर्व कागदपत्रे आहे संबंधित विभागाला ती सादर करत आहोत असं मेधाताई पाटकर म्हणाल्या.
मेधाताई पाटकर यांच्या विरुद्ध याआधी संजीव झा यांनी पासपोर्टच्या मुद्द्यावर तक्रार केली होती. यावेळी मेधाताई पाटकर मुख्य विश्वस्त असलेल्या बृन्हमुंबई चॅरिटी कमिश्नरकडे नोंद - नर्मदा नवनिर्माण अभियान एनजीओच्या बँक ऑफ इंडियाच्या 00101010006xxxx या अकाऊंटवर १८ जून २००५ या एका दिवशी १ कोटी, १९ लाख, २५ हजार ८८० रुपयांच्या देणग्या मिळाल्या. पण यात एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे, ही सर्व रक्कम २० वेगवेगळ्या खात्यांवरुन ५ लाख ९६ हजार २९४ रुपयांच्या एक समान रक्कमेच्या व्यवहारांच्या स्वरुपात जमा झाली होती. अशा आशयाच्या तक्रारीवर मेधाताई पाटकर यांनी लिखित जाहीर केलेल्या विधानात आमची खाती आणि ऑडिट अगदी स्पष्ट आहेत बँकेकडून प्राप्त झालेल्या आमच्या बँक स्टेट मध्ये सदर २० नोंदी नाहीत. आरोप पूर्णपणे खोटा आहे अशी लिखित प्रतिक्रिया दिली आहे.
याव्यतिरिक्त मेधाताई पाटकर यांच्या या एनजीओला संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (पूर्वीचे माझगांव डॉक लिमिटेड) कडून जानेवारी २०२० ते मार्च २०२१ या लॉकडाऊन काळात वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये ६ टप्प्यांमध्ये ६२ लाखांच्या देणग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे आता या सरकारी संस्थेच्या खात्यावरुन पाटकर यांच्या खात्यावर नेमके कशा आणि कोणी देणग्या दिल्या याची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मेधाताई पाटकर यांनी दिलेल्या लिखित विधानात म्हटले आहे की, माझगाव डॉक सीएसआर सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाकडून आमच्या नर्मदा जीवनशाळेतील आदिवासी मुलांसाठी २ वर्षांच्या अन्नासाठी पुरविण्यात आली होती. याबाबत रक्कम खर्च अहवाल आणि लेखाजोखा त्यांना सादर करण्यात आला. या CSR समर्थनाची शिफारस नंदुरबार जिल्हाधिकार्यांनी केली होती कारण ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आमच्या जिल्ह्यात अनेक उपक्रमांना पाठिंबा देत आहे, म्हणून आम्ही स्विकारले अशी प्रतिक्रिया दिली आहे.
संजीव झा नावाच्या व्यक्तीने आपल्या तक्रारींच्या आधारे ईडी, आयटी कार्यालय, डीआरआयनेही चौकशी सुरू केल्याचे त्याचे म्हणणे आहे. सदर तक्रारींबाबत आमच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत, संबंधित विभागाला आम्ही सर्व कागदपत्रे सादर करून त्यांचे समाधान करत असल्याची प्रतिक्रिया मेधाताई पाटकर यांनी लिखित स्वरूपात जाहीर केली आहे.
एकूणच गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमेवरील नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पाच्या बाधीत क्षेत्रात हजारो आदिवासींना न्याय हक्क मिळवून देण्याचे काम मेधाताई पाटकर यांनी गेली ३६ वर्षापासून सुरू ठेवले आहे. सदर कारवाईमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. धडगाव येथील नर्मदा आंदोलनाच्या कार्यालयावर संबंधित विभागाचे अधिकारी काय चौकशी करतात याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.