मराठवाड्याला भविष्यात पाण्याची कमतरता राहणार नाही, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नाशिक भागात पश्चिमेकडे पडणारे पावसाचे पाणी वाहून समुद्राला जाते. हे पाणी वळवून ते थेट मराठवाड्यात आणले जाणार आहे. त्यासाठी एक लाख कोटी रुपयांची योजना प्रगतीपथावर असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित पवार परभणीतील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही मोठी घोषणा केलीय.
परभणीतील महात्मा फुले विद्यालय मैदानावर शुक्रवारी पवार यांची जाहीर सभा पार पडली. या सभेला माजीमंत्री नवाब मलिक, आमदार विक्रम काळे, आमदार राजू नवघरे, जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर, शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख आदी उपस्थित होते. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाणी योजनेची घोषणा केली. उद्या ३ मार्च रोजी विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे.
तर १० मार्चला अर्थसंकल्पात पुरवणी मागण्या मांडल्या जाणार असल्याचं अजित पवार म्हणाले. सरकारी योजनांवर बोलताना अजित पवार म्हणाले, विरोधक लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहेत. पण लाडक्या बहिणींसह गरिबांच्या हिताच्या कोणत्याच योजना बंद पडणार नाहीत. महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्रातील सत्तेचा उपयोग करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. पंतप्रधान मोदी गरजू समाज घटकांसाठी असंख्य योजना राबवत आहेत. कोट्यवधी लोकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला. तरुणांना रोजगार देणार्या अनेक योजना आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सरकार काम करतंय.
मराठवाड्यातील गुन्हेगारीवर बोलतांना अजित पवार म्हणाले, गेल्या काही महिन्यांत मराठवाड्यात वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होतोय. मात्र हे महाराष्ट्राला परवडणारे नाहीये. हे वातावरण लवकरात लवकर निवळले पाहिजे. ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. गुन्हेगारांना कुणीही पाठीशी घालू नये. गुन्हेगार हा कायदा, नियम, संविधानापेक्षा मोठा नसतो, असं अजित पवार म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना यशस्वीपणे सामोरे जा, पक्षाचा झेंडा फडकवा, असे आवाहन कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. परभणी महानगरांतर्गत भूमीगत गटार योजना पूर्णतः रखडलीय. आजच आपण वरिष्ठ अधिकार्यांबरोबर चर्चा करत या योजनेंतर्गत अडथळे दूर करण्यासंदर्भात मुंबईत स्वतंत्र बैठक घेऊ आणि योजना मार्गी लावू, महानगरांतर्गत येणाऱ्या रस्त्यांची अवस्था निश्चितच बिकट आहे. रस्ते कामाकरीता निधी दिला जाईल, तसेच समांतर पाणी पुरवठा योजनाही मार्गी लावू, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.