राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले (Maharashtra Unseasonal Rain) आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) आणि गारपिटीमुळे शेत पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. जळगाव, अकोला, नांदेड आणि वाशिम या जिल्ह्यांतील अनेक गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावू घेतल्यामुळे शेतकरी चिंतेत आले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील खडकी बोरगाव, मोय खेडा दिगर, फतेपूर् फेक्री या गावांना सायंकाळी पाचच्या सुमारास वादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे घरांसह शेती पिकांचं मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शेती आणि घरांचे नुकसान झाल्याने शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. तेल्हारा, अकोट, बाळापुर आणि अकोला तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. तर पातुर तालुक्यातल्या मळसुर भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस पडला. या गारपिठीमुळे आणि अवकाळी पावसामुळे आंबा, लिंबू, टरबुज आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. सलग अर्धा ते पाऊन तास वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झाला. पावसामुळे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या पावसामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरीकांना काहीसा दिलासा मिळाला.
नांदेड जिल्ह्याला देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह हा अवकाळी पाऊस नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात बरसला. या अवकाळी पावसामुळे हळद, गहू, आंबा यासह फळबागांचे मोठ नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
वाशिम जिल्ह्यात विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. तर अनेक ठिकाणी गारपीट झाली. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर, रिसोड, मालेगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह आज पुन्हा मुसळधार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. जिल्ह्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण होतं. गारपिटीमुळं उन्हाळी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून हवामान विभागाकडून आणखी दोन दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दुसरीकडे, अमरावती जिल्ह्यामध्ये आज सकाळी अवकाळी पावसासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे चांदूरबाजार तालुक्यातील अनेक गावांना या गारपिटीचा मोठा फटका बसला. या गारपिटीमुळे कापणीला आलेला गहू जमीनदोस्त झाला. गव्हाच्या शेतामध्ये पाणीच पाणी झाले आहे. तर संत्र्याच्या बागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.