बारामती लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष उमेदवारी अर्ज भरेल असं जाहीर करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी काही दिवसांपूर्वी निवडणुकीतून माघारी घेतली. त्यानंतर त्यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची भेट देखील घेतली होती. यानंतर आत विजय शिवतारे येत्या ११ तारखेला सुनेत्रा पवार यांच्यासाठी सभा घेणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी आज बारामतीमधील (Baramati) सभेमध्ये याबद्दलची माहिती देत विजय शिवतारेंच्या बंडामागे कोणाची फूस होती याबद्दल देखील सांगितले.
अजित पवार यांनी या सभेदरम्यान भाषण करताना सांगितले की, 'विजय शिवतारे 11 तारखेला सभा घेत आहेत. त्यांनी मला त्यांचा फोन दाखवला त्यांना कोणा कोणाचे फोन आले आहेत हे दाखवले. तू माघार घेऊ नको, तू माघार घेऊ नको, तू फॉर्म ठेव असे म्हटले जात होते. ते जर नंबर तुम्हाला दाखवले तर तुम्हीच म्हणाल कुठल्या थराला राजकारण चालले आहे. त्यांनी मला, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना ते नंबर दाखवले. मी ज्यांच्यासाठी जीवाचं रान केलं तेच आता खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहेत.' असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.
अजित पवार यांचे कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या विजय शिवतारे यांनी बंडखोरी करत बारामतीमधून लोकसभा लढवणार असल्याची घोषणा केली होती. विजय शिवतारे यांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर विजय शिवतारे यांची नाराजी दूर झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर विजय शिवतारे यांनी बारामतीमधून लोकसभा लढवणार नसल्याचे जाहीर केले. पुढच्या पिढ्यांचे नुकसान टाळण्यासाठी माघार घेत असल्याचे त्यांनी जाहिरपणे सांगितले होते.
बारामतीमधून लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी विजय शिवतारे यांच्या सासवडमधील घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. अजित पवारांचे कट्टर विरोधक असल्याचे म्हटले जाणारे विजय शिवतारे हे आता सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचार करणार आहेत. येत्या ११ तारखेला ते सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचार सभा घेणार आहेत. या प्रचार सभेत ते नेमकं काय म्हणणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.