अकोल्यात पुन्हा एकदा पतसंस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या सामान्यांचा विश्वास तुटला आहे. अकोल्यातल्या जुने शहर भागातल्या श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्था सध्या डबघाईला आली आहे. यामध्ये हजारो ठेवीदारांचे लाखो रुपये अडकले आहेत. एप्रिल महिन्यापासून खातेधारकांना पैसे देण्यासाठी पतसंस्थेने हात वर केले आहे.
हजारो कुटुंबांनी दिवस दिवसभर कष्टाचा घाम गाळून पै पै जमवून पैसे साठवले. पालकांनी मुलांच्या भविष्याच्या आशेने ठेवी केल्या, निवृत्तीनंतर दोन पैसे जास्त येतील म्हणून पतसंस्थेत अनेक पेन्शनधारकांनी पैसे गुंतवले मात्र, त्या सगळ्यांच्या पदरात आता निराशा पडली आहे. कारण पतसंस्थेत गुंतवणूक करूनही त्यांना हक्काचे पैसे मिळणार नाहीत. अकोल्यातील नागरिकांनी मोठ्या विश्वासाने श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत पैसे गुंतवले होते मात्र आता ते बुडण्याची भीती त्यांना सतावते आहे. कारण ही पतसंस्था आर्थिक समस्येमुळे डबघाईला आली आहे.
नागरिकांनी पतसंस्थेकडे एप्रिल महिन्यापासून हक्काच्या पैशांसाठी तगादा लावला आहे. परंतु पतसंस्थेने पैसे देण्यासाठी पूर्णपणे हात वर केले आहेत.संस्थेकडून नागरिकांच्या प्रश्नाचं निरसन होत नसून त्यांच्या पैशांची परतावणी देखील केली जात नाही आहे. संस्थेच्या बाहेर दररोज सकाळी ११ वाजल्यापासून लोक तासन्तास उभे राहून सुद्धा नागरिकांच्या पदरी निराशा पडत आहे. मात्र प्रशासनाकडून पतसंस्था डबघाईस आल्याचं नाकारलं जात आहे. पतसंस्थेचं खेळतं भांडवल (लिक्विड मनी) कमी पडल्याने हा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला.
राज्यात आर्थिक डबघाई आल्यामुळे अनेक पतसंस्थांमध्ये ग्राहकांचे कोट्यावधी रुपये बुडाले आहेत. ही फक्त आर्थिक फसवणूकच नाही, तर ही सामान्य जनतेच्या विश्वासाची गळचेपी आहे. प्रशासनानं यात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी आता ग्राहकांमधून जोर धरू लागली आहे. दरम्यान ग्राहकांच्या हक्कच्या पैशांचा परतावा होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.