ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या अनधिकृत बांधकामाच्या ५० प्रकरणात गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात एकूण २६४ अनधिकृत बांधकामांवर महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी १९८ बांधकामे पूर्णपणे निष्कासित करण्यात आली आहेत. तर, ६६ बांधकामांमधील अनधिकृत वाढीव बांधकाम हटवण्यात आले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात जून महिन्यापासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरिक्षकांनी केलेल्या पाहणीत तसेच दिवा आणि मुंब्रा येथील विशेष दक्षता पथकांच्या पाहणीत आढळलेल्या एकूण २६४ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आतापर्यंत कारवाई केली आहे. तर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या कारवाईचा २७ सप्टेंबरला आढावा घेतला.
अनधिकृत बांधकामाबाबत कडक निर्देश
कोणतेही अनधिकृत बांधकाम सुरू राहू नये; यासाठी सर्व यंत्रणेने दक्ष राहावे. तसेच, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक त्या प्रकरणात तातडीने एमआरटीपीअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्देश महापालिका आयुक्त राव यांनी दिले आहेत. गुन्हे दाखल करताना प्रत्यक्ष पाहणी आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करून अचूक माहिती नोंदवावी, असेही आयुक्त राव यांनी सांगितले. ज्या अनधिकृत बांधकामांचे पाडकाम शिल्लक असेल त्याचे प्रवेश मार्ग (जिने) पाडून पत्रे लावून बंद करावेत, असेही त्यांनी म्हटले.
अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी लावणार क्यू आर
अनधिकृत बांधकामात घर घेऊ नये; असे आवाहन करणारे फलक मोक्याच्या जागी लावावे. नागरिकांनाही घर खरेदी करताना बांधकाम अधिकृत असल्याची खात्री महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून करून घ्यावी, असे आवाहनही आयुक्त राव यांनी केले आहे. तर अधिकृतपणे ज्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्या सर्व ठिकाणी दर्शनी भागात क्यू आर कोड लावण्यात आले आहे. ते क्यू आर कोड मोबाईलवर स्कॅन करून बांधकाम परवानगीची माहिती कोणालाही उपलब्ध होऊ शकते, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
गुन्हे दाखल करण्यात आलेल्या प्रकरणाचा तक्ता
- नौपाडा-कोपरी - ०१
- दिवा - ११
- मुंब्रा - १३
- कळवा - ०४
- उथळसर - ०१
- माजिवडा-मानपाडा - ०५
- वर्तक नगर - ०८
- लोकमान्य नगर - सावरकर नगर- ०७
- वागळे इस्टेट - ००
- एकूण - ५०
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.