विदर्भातील वाशिम जिल्हा संत्रा लागवडीसाठी ओळखला जातो. मात्र, भुर गावातील शेतकरी गोपाल देवळे यांनी आपल्या मेहनतीने आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या वापराने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. फळबाग लागवड योजनेचा लाभ घेत त्यांनी ६ वर्षांपूर्वी ८ एकर जमिनीत संत्रा लागवड केली आणि आज त्या मेहनतीचा परिपाक म्हणून त्यांनी तब्बल ४८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.
गोपाल देवळे यांनी सुरुवातीपासून ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून पाण्याचा काटेकोर वापर केला. यावर्षी निसर्गाच्या साथीनं आणि पोषक वातावरणामुळे त्यांना उत्तम उत्पादन मिळाले. वनोजा परिसरातील संत्र्याचा दर्जा उत्कृष्ट असल्याने या भागातील संत्र्याला महाराष्ट्रासह राज्याबाहेरही मोठी मागणी आहे. व्यापारी वर्ग देखील येथील फळबागांसाठी उत्सुकतेने पुढे सरसावला आहे.
विशेष म्हणजे यंदा प्रति टन ४३ हजार रुपयांचा बाजारभाव मिळत असून, गोपाल देवळे यांच्या उत्पादनाने ८ एकरांतून तब्बल ४८ लाखांचा टप्पा गाठला आहे. त्यांच्या या यशामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांनी गोपाल देवळे यांच्या शेताला भेट देत त्यांची मेहनत आणि जिद्दीचे कौतुक केले. त्यांनी कृषी विभागाला राष्ट्रपती कृषी पुरस्कारासाठी गोपाल देवळे यांच्या नावाची शिफारस करण्याच्या सूचना दिल्या.
गोपाल देवळे यांच्या यशाची कहाणी फक्त भुर गावापुरती मर्यादित नाही, तर ती संपूर्ण विदर्भासाठी प्रेरणादायी ठरली आहे. कमी पाण्यात संत्रा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांची मेहनत, जिद्द आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही संत्रा शेतीची नवी दिशा दाखवणारी कहाणी ठरली आहे.
मेहनत आणि योग्य तंत्रज्ञानाचा उपयोग केला, तर शेतीतही मोठं यश मिळवता येतं हे गोपाल देवळे यांनी दाखवून दिलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.