दहावी - बारावी परीक्षा सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्य़ांपासून-शिक्षणमंत्र्यांपर्यंत सर्वांनीच कॉपीमुक्त अभियानाची वाजत गाजत घोषणा केली. मात्र ही घोषणा 10 वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठी पेपर सुरू असताना हवेत विरली....कारण परीक्षा सुरू झाल्यानंतर केवळ तासाभरातच मराठीचा पेपर जालना जिल्ह्यातल्या बदनापूरमध्ये झेरॉक्स सेंटरवर आढळला...त्यानंतर काही क्षणात हाच फुटलेला पेपर साम टीव्हीच्या हाती लागला.
कसा फोडला 10 वीचा पेपर?
- जालन्याच्या बदनापूरमध्ये 10वीचा पेपर फुटला
- पहिल्या 15 मिनिटांत प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राबाहेर
- शहरातील झेरॉक्स सेंटरवरून प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स काढल्या
- प्रश्नपत्रिकेची झेरॉक्ट 20 रूपयांत विकण्यात आल्या
- प्रश्नांच्या उत्तरांच्या झेरॉक्स प्रत परीक्षा केंद्रांवर वाटल्या
पेपर फुटल्याची बातमी सर्वात आधी साम टीव्हीनं दाखवली आणि शिक्षण खात्याचं धाबं दणाणलं. संभाजीनगर बोर्डाच्या सचिवांनाही साम टीव्ही पाहूनच पेपर फुटल्याची बातमी कळल्याची कबुलीच त्यांनी दिली. त्यानंतर साम टीव्हीनं थेट पुणे बोर्डाच्या अध्यक्षांचं केबिन गाठलं. त्याठिकाणी बोर्डाचे सचिव वासुदेव कुलाड यांना गाठलं आणि त्यांनीही माध्यमातून बातमी कळाल्याचं सांगितलं आणि याबाबत चौकशी करणार असल्याचं सांगितलं.
सुरूवातीला बोर्डाचे अध्यक्ष आणि जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी फुटलेला पेपर आणि विद्यार्थ्यांना दिलेला पेपर हे वेगवेगळे असल्याचा दावा केला. मात्र साम टीव्ही आपल्या बातमीवर ठाम होतं. सामनं फुटलेली प्रश्नपत्रिका आणि पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांकडून मिळवलेल्या प्रश्नपत्रिकेची तपासणी केली असता दोन्ही प्रश्नपत्रिकेत साम्य असल्याचं आढळून आलं. त्यानंतर मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. विशेष म्हणजे वेगान सूत्र हलवत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं.
विशेष म्हणजे हे केवळ जालना जिल्ह्यातच झालं असं नव्हे...तर यवतमाळ जिल्ह्यातही प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. अशा प्रकारांमुळे वर्षभर मेहनत करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय तर होणार नाही ना? हा महत्त्वाचा सवाल आहे. मात्र पहिल्याच दिवशी फुटलेल्या पेपरमुळे बोर्डाच्या परीक्षेची लक्तरं वेशीला टांगली गेली आहेत. त्यामुळे आता पुढील पेपरबाबत बोर्ड, जिल्हा प्रशासन आणि पोलीस काय पावलं उचलणार आणि दोषींवर किती कडक कारवाई करणार याकडे लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.