शांतिनगरमध्ये मुलाकडून वृद्ध पित्याला घरातच मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल.
आई उपस्थित असूनही मारहाणीला थांबवण्याचा प्रयत्न केला गेला नाही.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करून मुलाला समज दिली.
पित्याने तक्रार नोंदवण्यास नकार दिला, सोशल मीडियावर संतापाची लाट.
नागपूर मधील शांतिनगर परिसरातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका तरुणाने आपल्या वडिलांना घराच्या चार भिंतीत मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. वयोमानानुसार आधार, प्रेम आणि आदराची गरज असलेल्या पित्याला स्वतःच्या मुलाकडून मिळालेला हा अमानुष अनुभव पाहून नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.
संबंधित व्हिडिओमध्ये दिसते, सायंकाळी घरातील सोफ्यावर वडील शांतपणे बसले आहेत. त्यांच्या बाजूलाच आई बसलेली असून, समोर नात्याला कलंक ठरलेला मुलगा टी-शर्ट आणि पँट परिधान करून वडिलांना वारंवार कानाखाली मारत आहे. कधी वडिलांचे केस ओढणे, कधी कान धरून हलवणे, तर कधी मान पकडून धक्काबुक्की करणे असे प्रकार सलग घडताना दिसतात. आई जवळ असूनही ती निष्क्रिय राहते आणि या हिंसक वर्तनाला थांबवण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही.
हा व्हिडिओ घरातीलच कुणीतरी चित्रीत केल्याचे सांगितले जात असून, मुलाच्या वागणुकीचा जाब विचारण्यासाठी आणि त्याला धडा शिकवण्यासाठी तो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पोलीस दलातील अनेकांच्या संवेदना जागृत झाल्या. संतप्त पोलिसांनी त्या मुलाचा शोध घेण्याचे ठरवले आणि तत्काळ संबंधित घर शोधण्याची मोहीम सुरू केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तामटे यांनी स्वतः हा व्हिडिओ पाहिला आणि पाहताक्षणी संताप व्यक्त करत कर्मचाऱ्यांना ठिकाण शोधण्याच्या सूचना दिल्या.
शांतिनगर परिसरातील घर गाठल्यानंतर पोलिसांनी मारहाण झालेल्या व्यक्तीशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी आश्चर्यकारकरित्या कोणतीही तक्रार नोंदवण्यास नकार दिला. "मला मारहाण झालेली नाही" असे सांगत त्यांनी हा विषय मिटवण्याचा प्रयत्न केला. आईनेही हा "घरगुती विषय" असल्याचे सांगून पोलिसांना उलट प्रश्न विचारला की, "तुम्हाला कोणी बोलावले?"
पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहून आपले कर्तव्य पार पाडत मुलाला समज दिली आणि कठोर शब्दांत इशारा दिला. जरी अधिकृत तक्रार दाखल झाली नसली तरी सोशल मीडियावरून पोलिसांपर्यंत पोहोचलेल्या या प्रकरणानंतर मुलाकडून पुन्हा अशा प्रकारची हिंसा होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गजानन तामटे यांनी सांगितले की, “आम्ही शक्य ते सर्व केले. तक्रार नोंदवली गेली नाही, तरीही मुलाला पोलीसाच्या भाषेत समज दिली. आता पुढे असे वर्तन पुन्हा होऊ नये, हीच आमची अपेक्षा आहे.”
ही घटना केवळ एका कुटुंबातील घरगुती कलह नसून, पालकांच्या सुरक्षिततेबाबतचे गंभीर वास्तव दाखवणारी आहे. कर्तव्य, आदर आणि प्रेमाची अपेक्षा असलेल्या या वयात जर पालकांनाच आपल्या मुलांच्या हातून मारहाण सहन करावी लागत असेल, तर तो केवळ त्या घराचा नव्हे, तर संपूर्ण समाजाचा पराभव मानला जाईल. सोशल मीडियावर सुरू असलेली संतप्त प्रतिक्रिया याच भावनेची साक्ष देते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.