विदर्भात गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांत घडलेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यवतमाळमध्ये नदीवरील पुलावरून कार वाहून गेल्याने आई आणि तिच्या दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. भंडारा आणि वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. तर बुलढाणा जिल्ह्यात घराची भिंत कोसळल्याने एका महिलेचा जीव गेला.
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा-लोणी रस्त्यावर असलेल्या कुपटी नदीच्या पुलावरून पाणी वाहत होतं. पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने एका कुटुंबाची कार थेट पुराच्या पाण्यात वाहून गेली. या अपघातात माधवी अविनाश खंदारे (४०), प्राची अविनाश खंदारे (१७) आणि साची अविनाश खंदारे (१२) या तिघींचा बुडून मृत्यू झाला. मात्र कार चालवत असलेले अविनाश खंदारे यांचा जीव थोडक्यात बचावला. त्यांच्यावर दारव्हा इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लोणीमध्ये राहणारे अविनाश खंदारे हे पत्नी आणि दोन मुलींसह राळेगावमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री ते परतत होते. वाटेत दारव्ह्याजवळील बोरी अरबमध्ये त्यांनी एका नातेवाइकाला सोडलं आणि त्यानंतर लोणीकडे निघाले.
दहेली परिसरात कुपटी नदीच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं. पाण्याचा वेग किती आहे, याचा अंदाज न आल्याने त्यांनी कार पुढे नेली. काही क्षणांतच कार पाण्याच्या प्रवाहात अडकली आणि पुलावरून वाहून गेली.
कारमध्ये पाणी भरू लागल्यानंतर अविनाश यांनी मोबाईलवरून नातेवाइकांना फोन करून मदत मागितली. मात्र, काही वेळातच कार पुराच्या पाण्यासोबत दूर वाहून गेली. त्याचवेळी त्यांच्या हाताला झाडाची फांदी लागली. त्यांनी ती पकडून झाडावर चढत स्वतःचा जीव वाचवला.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि गावातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. मात्र पुलाजवळ कार कुठेच दिसत नव्हती. त्यांनी आवाज देत शोध घेतला, पण सुरुवातीला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर बचाव पथकाने शोधमोहीम सुरू केली. या वेळी अविनाश खंदारे हे झाडावर बसलेल्या अवस्थेत आढळले.
माधवी, प्राची आणि साची यांचा शोध घेण्यासाठी शुक्रवारी सकाळपासून शोधमोहीम सुरू करण्यात आली. दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास पुलापासून काही अंतरावर चिखलात अडकलेली कार सापडली. बचाव पथकाने कार बाहेर काढल्यानंतर तिघींचेही मृतदेह मिळाले.
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मांदेड गावात अतिवृष्टीमुळे नाल्याला मोठा पूर आला होता. गुरुवारी सकाळी सुमारे ११ वाजता श्रीराम मारोती भरे (६६) हे घराबाहेर पडले. गावाजवळील नाला ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा पाय घसरला आणि ते पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. शुक्रवारी त्यांचा मृतदेह सापडला.
वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात खडका-मडका परिसरातून वाहणाऱ्या बोर नदीत एक व्यक्ती वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अल्लीपूर-टाकळी रस्त्यावरील यशोदा नदीच्या पुलाजवळ पळसगावमधील अक्षय माटे (३५) हे नाल्यावरून जात असताना अचानक पाण्याचा वेग वाढला आणि ते वाहून गेले. मात्र, त्यांना वेळेत बाहेर काढण्यात आल्याने त्यांचा जीव वाचला.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमधील फुलेनगर भागात मुसळधार पावसामुळे एका घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत सरुबाई पल्हाडे (७०) यांचा मृत्यू झाला. सध्या विदर्भातील बहुतांश भागात पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात पाऊस पुन्हा जोर धरू शकतो. त्यामुळे नदी, नाले आणि पूल ओलांडताना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.