यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारी झालीय. त्यामुळे शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलीय.आज श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी बारावे ज्योतिर्लिंग असलेले घृष्णेश्वर मंदिर शिवभक्तांनी गजबजून गेलंय. बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ येथील घृष्णेश्वराच्या दर्शनाला मोठं महत्त्व आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळ येथील मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त मध्यरात्री १२ वाजता घृष्णेश्वराला पंचामृताने अभिषेक घालण्यात आलाय. या पूजेनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आलं. आज पहिल्याच दिवशी देशभरातून शिवभक्त दर्शनासाठी दाखल झालेत. शिवभक्तांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून पोलीस आणि मंदिर प्रशासनाने खबरदारी घेतलीय.
आज पहिलाच श्रावणी सोमवार
आजपासून श्रावण मासास सुरुवात होत आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या (Shravan 2024) आहेत. ७१ वर्षानंतर पहिल्याच दिवशी श्रावणात सोमवार आल्याने भाविकांची मोठी गर्दी झालीय. पहाटे पाच ते रात्री नऊपर्यंत त्रंबकेश्वर मंदिर खुले राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
भाविकांची मंदिरात तुफान गर्दी
आज श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार आहे. यानिमित्ताने देशातील १२ जोतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या, बीडच्या परळी येथील प्रभु वैद्यनाथाच्या मंदिरामध्ये भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी (First Shravani Somvar) केलीय. आज पहाटेपासूनच वैद्यनाथांच्या दर्शनासाठी भाविकानी रांगा लावल्या आहेत. विशेष म्हणजे भाविकांना प्रभू वैद्यनाथाचे स्पर्श दर्शन घेता येणार आहे. रात्री बारा वाजल्यापासून हे स्पर्श दर्शन सुरू झालंय. आज मध्यरात्री १ वाजेपर्यंत हे स्पर्श दर्शन सुरू राहणार आहे.
पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त देशभरातील शिवमंदिरे भाविकांनी गजबजली (Shravan Somvar) आहेत. देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात मध्यरात्रीपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचं पाहायला मिळतंय. मध्यरात्री दोन वाजता शासकीय महापूजा आटोपल्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी हे मंदिर खुले करण्यात आले होते. श्रावणी सोमवारनिमित्त ठाण्यातील प्राचीन अश्या कोपिमेश्वर मंदिरात पहाटेपासुन भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केलीय.
दर्शनासाठी लांबच लांब रांगा
श्रावण महिन्याचा पहिला सोमवार सर्वात महत्वाचा मानला जातो. आज बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकरला पहाटेची महाआरती करत मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक, डुमरु आणि शंखनाद (Shiv Puja) करण्यात आला. त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आलं. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त देश भरातील शिव मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत.
आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथमध्ये मध्यरात्रीपासून लाखो भाविक दाखल झालेत. औंढा नागनाथ मंदिर संस्थानच्या वतीने शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी औंढा नागनाथ मंदिर मध्यरात्री दोन वाजता खुलं करण्यात आलं होतं. आंध्रप्रदेश, कर्नाटक यासह मध्य प्रदेशातील भाविकांनी देखील औंढा नागनाथमध्ये शिवशंकराच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.