Rohit Pawar News SaamTv
महाराष्ट्र

Rohit Pawar News : धक्कादायक! रोहित पवारांचा निसटता विजय, लीड कमी झाल्याच्या धक्क्याने कार्यकर्त्याचा मृत्यू

Karjat-Jamkhed Assembly News : विधानसभा निवडणुक निकालाच्या दिवशी मविआचे दिग्गज नेते पराभूत झाले. कर्जत-जामखेड मतदारसंघात देखील रोहित पवार यांचा अत्यंत कमी फरकाने विजय झाला. मात्र त्यापूर्वी मतांच्या कमीअधिक होणाऱ्या आकडेवारीच्या धक्क्याने रोहित पवार यांच्या दोन कार्यकर्त्यांचं दुर्दैवी निधन झालं आहे.

Saam Tv

अहिल्यानगर : कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांच्या कमी-जास्त होणाऱ्या मतांच्या आकडेवारीच्या धक्क्याने कर्जत तालुक्यातील येजेराव काळे यांच्या निधनानंतर आणखी एका कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नजीर सय्यद (वय 45) असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. आत्तापर्यंत कर्जत तालुक्यात रोहित पवार यांच्या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.

विधानसभा निवडणुकीचं धुमशान राज्यात पेटलेलं आहे. निवडणूक निकालानंतर आता याला पूर्णविराम लागला आहे. एकीकडे राज्यात महायुतीच्या सरकारने जनतेचा एकतर्फी कौल मिळवून गुलाल उधळला आहे. तर महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. यात मविआच्या अनेक दिग्गज मंत्र्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरलेली दिसून आली. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांत नाराजीचं वातावरण होतं.

मविआचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे आमदार रोहित पवार यांच्यासाठी देखील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अटीतटीची ठरली. याठिकाणी राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात लढत झाली. अखेर त्यांचा विजय झाला. यानंतर विजयी गुलाल देखील उधळला गेला. मात्र त्यापूर्वी निकाल प्रक्रिया सुरू असताना मतमोजणीदरम्यान धक्कादायक प्रकार घडला.

कर्जत जामखेड मतदारसंघाची लढत अगदी उशीरापर्यंत रंगली. रोहित पवार हे काही काळ पिछाडीवर पडले होते. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांत धाकधूक वाढली होती. यात रोहित पवारांचा 352 मतांनी पराभव झाल्याची बातमी समोर आली. मात्र, नंतर मशीनमध्ये तांत्रिक घोळ झाल्याने पुन्हा मतमोजणी करण्यात आली. याचवेळी रोहित पवार यांची लीड कमी झाल्याने त्यांच्या नजीर सय्यद या कार्यकर्त्याला जबर धक्का बसून हृदयविकाराचा झटका आला. सय्यद यांना यानंतर तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

आत्तापर्यंत दोन कार्यकर्त्यांचा दुर्दैवी मृत्यू..

रोहित पवार यांना कर्जत-जमखेडमधून जरी निसटता विजय मिळाला असला, तरी त्यांच्या पिछाडीने आणि कमीअधिक होणाऱ्या मतांच्या आकडेवारीच्या धक्क्याने आत्तापर्यंत दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झालाय. नजीर सय्यद यांच्या आधी येजेराव काळे (वय 60) यांचा देखील हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. शिंपोरा गावातील येजेराव काळे हे टीव्हीवर मतमोजणीच्या बातम्या बघत असताना रोहित पवार यांच्या पिछाडीची माहिती मिळाल्यानंतर काळे यांना धक्का बसला. त्यातच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचं देखील दुर्दैवी निधन झालं.

रोहित पवार काठावर पास..

कर्जत-जामखेडमध्ये महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार यांचा 1 हजार 243 मतांनी विजय झाला आहे. रोहित पवार यांना 1 लाख 27 हजार 676 मतं मिळाली. तर महायुतीचे आमदार राम शिंदे यांना 1 लाख, 26 हजार 433 मतं मिळाली. त्यामुळे रोहित पवार हे यावेळी काठावर पास झालेले दिसून आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

Beetroot Benefits: हिवाळ्यात बीट खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Constitution Day : संविधान वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक; संविधान दिनी PM मोदींचा दहशतवाद्यांनाही कडक इशारा

Health Tips: हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्याने मिळतात जबरदस्त फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला? भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर

SCROLL FOR NEXT