सुरज सावंत
पुणे : केंद्रातील भाजपच्या बड्या नेत्यांना मुंबईत येऊन महापालिकेच्या निवडणुकीच्या (bmc election) प्रचाराचं भाषण करावं लागतं. केंद्रातील नेतृत्वाला मुंबईत निवडणुकीसाठी यावं लागतं म्हणजे राज्यातील स्थानिक नेत्यांमध्ये धमक नाही का? असा सवाल करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या मुंबई दौऱ्यावर खोचक टोला लगावला. भाजपच्या अशा अजेंड्यामुळं शिवसेनेचा नैतिक विजय झाला आहे, असं म्हणत दानवे यांनी भाजपवर (BJP) खरमरीत टीका केली आहे. दानवे गणपती दर्शनासाठी पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी ते बोलत होते.
केंद्रातील नेतृत्वाला मुंबईत निवडणुकीसाठी यावं लागतं म्हणजे राज्यातील स्थानिक नेत्यांमध्ये करिष्मा नाही का, असा प्रश्न उपस्थित करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर खोचक टोला लगावला. मागील निवडणुकीतही भाजपने अशीच घोषणा केली होती.
त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. तरीही शिवसेनेने विजय प्राप्त केला होता. मात्र, आता राज्यात फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. शिवसैनिकांमध्ये जिद्द व उत्साह पाहायला मिळतोय.निवडणूक नसतानाही शिवसेनेची शक्ती जनतेत पाहायला मिळते, त्यामुळे शिवसेनेचा दैदिप्यमान विजय होईल, असा विश्वास दानवे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत बोलताना व्यक्त केला.
मुंबई आमची असं भाजपचा सूर नेहमीच असतो. मात्र कंपन्यांचे व्यापार आणि व्यवसाय अहमदाबादला नेत आहेत. त्यामुळे मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनतेमध्ये भाजपविरोधात प्रचंड चीड आहे.येणाऱ्या काळात जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा दानवे यांनी दिला. शिवसेना आजही जमिनीवर आहे. शिवसेनेला जमीन दाखवण्याची गरज नाही. अमित शहा म्हणत असतील, खऱ्या शिवसेनेसोबत युती केली. पण यापूर्वी मातोश्रीवर नतमस्तक होत होते, त्याचं काय? खरी शिवसेना कोणती आहे, हे जनतेला चांगलं माहित आहे, असं म्हणत दानवेंनी भाजपचा समाचार घेतला.
शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवतीर्थावरच दसरा मेळावा होतो. एक मैदान, एक नेता आणि एक झेंडा असं शिवसेना म्हणते. यंदाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा होईल. ज्या ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत कोणाची तरी बदनामी केली होती. त्यांना आता भाजप सोबत घेणार काय, असा सवाल दानवे यांनी केला. तर शिंदेंच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीवर दानवे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा वसा उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवला. त्यामुळे बाकीच्या ठाकरेंच महत्त्व अधोरेखित होत नाही, असंही दानवे म्हणाले.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.