राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू आहे. राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगर सुरू असून, शिंदे गट ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये असल्याचं समोर आलंय. शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार हे निश्चित असल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. याच दाव्यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर भाष्य केलंय. ते आकडा चुकीचं सांगत असल्याचं संजय राऊत म्हणाले. तसेच, 'शिंदे गट हा भाजपच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे. तो कधीही कापून टाकला जाईल', असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.
'ऑपरेशन टायगर, ऑपरेशन कमळ होईल. पण आधीच ऑपरेशन रेडा झालेला आहे. कालच आम्ही आमच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं. त्यावेळी सर्व खासदार उपस्थित होते. ते आकडा चुकीचा सांगत आहेत. त्यांनी पैकीच्या पैकी आकडा सांगावा. ते कोणत्या गुंगीत आहेत? हे त्यांनी समजून घ्यायला हवंय. त्यांनी वैद्यकीय चाचणी पूर्ण करायला हवी', असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
तसेच राहुल गांधी १२:३० वाजता पत्रकार परिषद घेतील. त्यात ते महाराष्ट्राच्या निवडणुकींमध्ये जे काही घोटाळे झालेत, त्याबद्दल पुराव्यासकट माहिती देणार असल्याचंही संजय राऊत म्हणाले.
ऑपरेशन टायगर
ऑपरेशन टायगरवरून संजय राऊतांनी शिंदे गटावर टीकेचे बाण सोडलेत, तसंच टोलाही लगावलाय. 'ते कसलं ऑपरेशन करणार आहेत. मुख्यमंत्री हे रोज त्याचं ऑपरेशन करीत आहेत. रोज त्यांचा अपमान होत आहे. शिंदे गट हा भाजपच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे. तो कधीही कापला जाईल. पोटात अपेंडिक्सची गाठ असते, ती कधीही कापली जाते. आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमचं अपेंडिक्स ऑपरेशन फडणवीस करत आहेत, तुम्हीच काळजी घ्या', अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे गटाला टोला लगावला.
उदय सामंतांच्या वक्तव्यावरून चर्चा
'मिशन सांगून राबवण्यात येत नाही. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी ज्या पद्धतीनं काम केलंय. त्याकरिता मिशन राबविण्याची गरजच नाही. काही लोकांना कळून चुकलंय बाळासाहेबांचे विचार नेणारी शिवसेना शिंदे साहेबांचीच आहे. त्यामुळे अनेक नेते संपर्कात आहेत. त्यांचा टप्प्या टप्प्यानं प्रवेश होणार हे निश्चित', असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.