Ratan Tata Passed Away: देशातील ज्येष्ठ उद्योगपती, टाटा सन्सचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण श्री. रतन टाटा यांचे बुधवारी निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक दिग्गजांनी रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. रतन टाटा यांचे पार्थिव सध्या त्यांच्या हलेकाय या राहत्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांना एनसीपीए याठिकाणी टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल.
टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे दुःखद निधन झाले. रतन टाटा यांनी बुधवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या निधनानंतर बुधवारी रात्रीच त्यांचे पार्थिव रुग्णालयातून घरी आणण्यात आले. सध्या रतन टाटा यांचे पार्थिव हलेकाय या राहत्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. सकाळी १० वाजता हलेकाय येथून टाटा यांचे पार्थिव नरीमन पॉईंट येथील एनसीपीए याठिकाणी हलवण्यात येईल. सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांना एनसीपीए याठिकाणी टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल.
एनसीपीएच्या प्रवेशद्वार क्रमांक ३ मधून लोकांना अंत्यदर्शनासाठी प्रवेश दिला जाईल, तर प्रवेशद्वार क्रमांक २ मधून नागरिकांना दर्शन घेऊन बाहेर पडता येईल. दुपारी ३.३० वाजता टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कार करण्यासाठी वरळीच्या दिशेने रवाना होईल. सायंकाळी ४ वाजता मरीन ड्राईव्ह मार्गे पेडर रोड करत ही अंत्ययात्रा वरळी येथील स्मशानभूमीत पोहचेल. सायंकाळी ४.३० वाजता टाटांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातील. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी भारतीय उद्योग जगताचे पितामह आणि टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जमशेदजी टाटा यांनी दीडशे वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या टाटा साम्राज्याचे श्री रतन टाटा हे मुकुटमणी होते. आधुनिक व्यवस्थापकीय तत्त्वांचा अंगीकार करताना रतन टाटा यांनी समूह संस्थापकांच्या दृष्टिकोनाबाबत कधीही तडजोड न करता टाटा समूहाला एक विश्वसनीय भारतीय जागतिक ब्रांड म्हणून प्रस्थापित केले. १४० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन टाटा समूहाने आपल्या उत्पादन व सेवेच्या माध्यामातून स्पर्शले, याचे श्रेय जसे टाटा समूहाचे आहे.
अनेक क्षेत्रात नीती मूल्यांशी तडजोड होत असताना देखील रतन टाटा यांनी वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात शाश्वत भारतीय नीतीमूल्यांची कसोशीने जपणूक केली. विकसित भारताचे उद्दिष्ट प्राप्त करताना त्यांनी प्रस्थापित केलेल्या विश्वास, उत्कृष्टता व नाविन्यता या मूल्यांचा प्रत्येक क्षेत्रात अंगीकार करणे, हीच टाटा त्यांना सच्ची श्रद्धांजली ठरेल, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.